कारवाईचा केवळ फार्स

जप्त वाहनांवरील दंड नेमका किती : रकमेत तडजोड सुरू

पुणे – रस्त्याच्या कडेला आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने जप्त करण्याचा धडाका वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. जप्त वाहनांवरील दंड नेमका किती? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. यामुळे ही कारवाई म्हणजे केवळ फार्स ठरला असून, तडजोडीने कमी रकमेत गाड्या सोडून देण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांवर मध्यरात्री कारवाई केली जाते. दुचाकी वाहने ट्रकमधून, तर अन्य वाहने टोईंग करून भिडे पूलानजिक मोकळ्या जागेत आणली जात आहेत.

महापालिकेने जाहीर केलेल्या नियमानुसार दुचाकी गाड्यांना पाच हजार, तीनचाकी गाड्यांना दहा तर चारचाकी गाड्यांना पंधरा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या नावाची पावती फाडल्यास हा दंड पंधरा हजार रुपये तर पोलिसांची पावती फाडल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

महापालिकेने या कारवाईसाठी क्रेन, ट्रक, जॅमर अशा गोष्टी पुरवल्या आहेत. तसेच जो दंड वसूल केला जात आहे, त्यातील निम्मा दंड वाहतूक पोलिसांनी महापालिकेला द्यायचा आहे. मात्र महापालिकेने निश्‍चित केलेला दंड आकारला जात नसल्याने ही दंडाची रक्‍कम किती, कोणी ठरवली याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गाड्या उचलून ज्या ठिकाणी ठेवल्या जात आहेत, त्याठिकाणी त्याचे नुकसान होत आहे. त्याबाबत अनेक वाहनमालकांनी तक्रार केली आहे. मात्र, ज्या ठिकाणी 24 तासांपेक्षा जास्त काळ वाहन रस्त्यावर लावले आहे, त्यावेळी गाड्यांची काळजी गाड्यांचे मालक घेत नाहीत, त्यांना त्याची काळजी वाटत नाही. पोलिसांनी त्या उचलल्या तर पोलिसांना दोष दिला जात आहे. गाड्यांची एवढी काळजी असेल, महागड्या गाड्या असतील असे म्हणणे असेल, तर त्यांनी रस्त्यावर पार्क करण्याऐवजी सुरक्षित जागेवर त्या पार्क कराव्यात असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

नदीपात्रातील गाड्यांचे काय?
नदीपात्रात दुतर्फा पार्क केलेल्या गाड्यांबाबत मात्र वाहतूक पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याची ओरड अनेक वाहनचालकांनी केली आहे. याठिकाणीही रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जातात. भिडे पूलापासून ते जयंतराव टिळक पूलापर्यंत नदीकाठच्या रस्त्यावर या गाड्या लावल्या जात असल्याचे दृष्य आहे. एवढेच नव्हे तर जाहीरातीसाठी वापरले जाणारे टेम्पोदेखील येथेच पार्क केल्याचे दिसून येते. यावर मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.

ही जबाबदारी वाहतूक पोलिसांना दिली आहे. कारवाईचे अधिकारही त्यांना दिले आहेत. त्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.

– माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)