कारच्या काचा फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला 1 वर्षे सक्तमजुरी

पुणे- स्वीफ्ट डिझायर कारच्या काचा फोडून आतमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाला 1 वर्षे सक्तमजुरी आणि पंधराशे रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यापासून दीड महिन्याच्या आत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विक्रांत लक्ष्मण बोरकर (वय 22, रा. येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत रशितकुमार गोविंदराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 20 सप्टेंबर 2018 रोजी घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. घटनेच्या दिवशी गाडी लावून फिर्यादी कामाला गेले होते. दुपारी जेवण केल्यानंतर रस्त्याच्या कडेला गाडी त्यांनी पार्क केली. त्यानंतर गाडी लॉक करून ते कंपनीत कामाला गेले. सायंकाळी 6.15 च्या सुमारास कामावरून परत आले. त्यावेळी गाडीजवळ पोलीस आणि लोकांची गर्दी दिसली. लोकांनी एका मुलास पकडून ठेवले होते. त्या मुलाचे नाव बोरकर असून, त्याने गाडीची काच फोडल्याचे फिर्यादींना समजले. त्याने गाडीची काच फोडून गाडीत प्रवेश केला. तेथे उचकाउचक केली होती. मात्र, गाडीतील कोणतीही वस्तु चोरीला गेली नसल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेले. त्यावेळी अंगझडतीमध्ये त्याच्याकडे स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी पक्कड आणि लोखंडी छन्नी मिळून आली. त्यानंतर फिर्यादीने फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल गिरमकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत 1 वर्षे सक्तमजुरी आणि पंधराशे रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंडाची रक्कम फिर्यादीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)