मलकापूर येथील घटना, अज्ञातावर गुन्हा
कराड, दि. 3 (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू महामार्गालगत पार्किंग केलेल्या कारची पुढील काच फोडून कारमधील 2 लाख 55 हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी दुपारी मलकापूर (ता. कराड) येथील नटराज चित्रपटगृहासमोर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार पेठेतील शंतनू शशिकांत पाटील हे त्यांचे वडील शशिकांत पाटील, मित्र प्रवीण दिलीप मोहिते व कार चालक किशोर मधुकर साळुंखे, असे चौघेजण पाटील यांच्या ऍसेट कारने (क्र. एम. एच. 42 ए. 1209) सोमवारी सकाळी उंब्रजला गेले होते. तेथील सब रजिस्ट्रार कार्यालयात साठेखत झाले. त्याचे खरेदी ऍडव्हॉन्स म्हणून मिळालेली 2 लाख 55 हजार रूपयांची रक्कम शंतनू पाटील यांनी एका पिशवीत ठेवून ती पिशवी कारच्या चालक केबिनमधील ड्रॉव्हरमध्ये ठेवली. तेथून सर्वजण दुपारी एकच्या सुमारास मलकापूर येथील पाटील यांच्या शेतातील वस्तीवर गेले. तेथे पाटील यांनी वडील शशिकांत पाटील यांना सोडले. त्यानंतर गाडीच्या सीटच्या कुशनची चौकशी करण्यासाठी अन्य तिघांसमवेत पाटील कारने मलकापूर येथील नटराज चित्रपटगृहाजवळ आले. रस्त्याकडेला कार पार्किंग करून ते मित्रासमवेत दुकानात गेले. दहा मिनिटांनी कारचे दरवाजे लॉक करून चालक किशोर साळुंखे हाही दुकानात गेला.
सर्वजण पावणे दोनच्या सुमारास कारजवळ आले. त्यावेळी कारची पुढील काच फोडून चोरट्यांनी ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली 2 लाख 55 हजार रूपयांची रोकड असलेली पिशवी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. हवालदार विनोद पवार तपास करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा