काय सांगताय महापालिका कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टर?

पिंपरी- वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना महापालिकेत येण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करुन द्यावी. तसेच कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या प्रत्येक मजल्यावर शाकाहारी-मांसाहारी कॅन्टीन उपलब्ध करुन देण्याची हटके उपसूचना करण्यात आली. याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र, एकही उपसूचना स्वीकारायची नसल्याचे सांगत, या सर्व उपसूचना फेटाळून लावल्या.

महापालिकेच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त सभागृहात अभिरुप सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी महापौर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, तर पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भूमिका बजावली.
या सभेला महापौर श्रावण हर्डीकर, उपमहापौर प्रवीण आष्टीकर, सभागृह नेता प्रवीण तुपे, विरोधी पक्षनेता दिलीप गावडे उपस्थित होते. तर आयुक्त म्हणून महापौर राहुल जाधव यांनी प्रशासन प्रमुखाची भुमिका बजावली. याशिवाय सचिन चिंचवडे आणि ममता गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त, तर नगरसचिव म्हणून एकनाथ पवार यांनी कामकाज पाहिले.

-Ads-

गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या सभेला सुरुवात झाली. या सभेत महापौर राहुल जाधव यांनी आयुक्तांची भुमिका वठविण्यासाठी प्रशासकीय वेशभूषा व दाढी देखील राखली होती. मात्र वारंवार आयुक्त असल्याचा विसर पडून, महापौर असल्याच्या भुमिकेत जात असल्याने त्यांच्या वक्तव्याने सभागृहात अनेकदा हास्याचे फवारे उडाले. त्यांना महापौर असलेल्या हर्डीकर यांनी आयुक्त असल्याची अनकेदा जाणीव करुन दिली. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.

महापालिकेचे “झिरो बजेट’ असल्याची सभागृहाला माहिती देणाऱ्या मुख्य लेखा परीक्षक आशा शेंडगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. तर मग आता निधी उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर हर्डीकर यांनी सुचविलेल्या उपाययोजनांमुळे सभागृह हास्यात बुडाले. सभागृहाला चुकीची माहिती देणारे ज्ञानदेव ओंबासे यांचे सभागृहातून पहिल्यांदा तीन मिनिटे नंतर दुसऱ्या चुकीसाठी तीस वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली. याचे स्पष्टीकरण प्रशासनाला देता आले नाही. अभिरूप सभेच्या विषय पत्रिकेवर एकूण पाच विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन विषय मंजूर करण्यात आले. तर भटक्‍या कुत्र्यांवरुन सभागृहातील गदारोळ टाळण्यासाठी अभिरुप सभा एक वर्षे कालावधीकरिता तहकूब करण्यात आली.

अधिकाऱ्यांच्या तयारी समोर लोकप्रतिनिधी फिके
अभिरूप सभेकरिता लोकप्रतिनिधींच्या भुमिकेत असलेल्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे प्रशासनाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अधिकाऱ्यांच्या भुमिकेतील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या अनपेक्षित उत्तरांमुळे सभागृह अनेकदा हास्यात बुडाले. महापौरांच्या भुमिकेतील श्रावण हर्डीकर यांना “व्यवस्थित तयारी केली नाही’ असे वारंवार सांगावे लागले. त्यामुळे अभिरुप सभेच्या निमित्ताने का होईना अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या नगरसेवकांची शाब्दिक कोंडी करत अधिकाऱ्यांनी चांगलेच उट्टे काढले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)