काय? पीएमपी पुन्हा राबविणार भरती प्रकिया

– कामगारांची भरती करण्यास इंटकची कोणतीही हरकत नसेल. उलट या भरतीला संघटनेचा पाठिंबाच असणार आहे. मात्र, यापूर्वी दोन वेळा राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना संधी देण्याची गरज आहे. त्यांचा विचार न केल्यास या प्रक्रियेला पूर्णपणे विरोध असेल.
अशोकराव जगताप, उपाध्यक्ष, पीएमटी कामगार संघ (इंटक)

पुणे – अवघ्या अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल दोन भरती प्रक्रिया राबविण्यास अपयश आल्यानंतर पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबविण्याचा घाट “पीएमपीएमएल’ प्रशासनाने घातला आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. नव्या बस येण्याची चाहूल लागल्यानंतर वाहक आणि चालक या पदासाठी प्रशासनाच्या वतीने नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत. येत्या महिनाभरात त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून त्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

वाहक आणि चालकांची संख्या कमी असल्याचे कारण दाखवून 2012 साली या पदांसाठी पीएमपीने अर्ज मागविले होते. त्यावेळी तब्बल 90 हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी प्रशासनाने प्रत्येकी 600 रुपये घेतले. परिक्षेची प्रक्रिया संपल्यानंतर पात्र उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली होती. मात्र, थोड्याच दिवसांत ही भरती प्रक्रियाच गुंडाळण्यात आली. त्याशिवाय पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली नाहीत. मात्र, पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविली, त्यावेळीही 89 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. प्रशासनाने लेखी परीक्षेच्या नावाखाली प्रत्येकी 600 रुपये घेतले होते. त्यानंतर तांत्रिक कारण देऊन प्रशासनाने ही भरती प्रक्रियाही गुंडाळली. ही भरती प्रक्रिया गुंडाळल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचे शुल्क परत करणे आवश्‍यक होते. मात्र, पाच ते सहा वर्षांच्या कालावधीनंतरही या उमेदवारांना अजूनही पैसे परत देण्यात आलेले नाहीत. असे असतानाच प्रशासनाने पुन्हा एकदा नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; त्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली आहे. येत्या महिनाभरात त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीएमएल मधील सूत्रांनी “प्रभात’ ला दिली. याबाबत पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)