काय खावं, काय बोलावं याचा अधिकार सर्वसामान्यांना कुठेय?

स्मिता पानसरे : अकोले येथे कॉ. बुवासाहेब नवले सद्‌भावना पुरस्कारांचे वितरण
अकोले- आज आपल्या देशात व राज्यात कुणी काय खावं? काय बोलावं, कुणी कुणावर प्रेम करावं? याचा अधिकार सर्वसामान्यांना कुठे राहिलायं? यातून माणसांच्या व्यक्‍तिगत जीवनावर घाला घातला जातोय. अशा वातावरणातही कॉम्रेड बुवासाहेब नवले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला देण्याचे धाडस दाखविण्यात आले. महिला हक्‍कासाठी लढणाऱ्या व कम्युनिस्ट चळवळीच्या आघाडीच्या नेत्या स्मिता पानसरे यांनी ही भावना व्यक्‍त केली.

अकोलेतील बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व बुवासाहेब नवले मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कॉ. बुवासाहेब नवले सद्‌भावना पुरस्काराचे माजी मंत्री मधुकर पिचड व कवी नारायण सुमंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले; त्यावेळी पानसरे बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. व्यासपीठावर आयोजक बुवासाहेब नवले पतसंस्था व अभिनव परिवाराचे अध्यक्ष मधुकर नवले, प्रा. सोपानराव देशमुख, सतीशराव नाईकवाडी, शिरीष नाईकवाडी, अगस्तीचे संचालक सुरेश गडाख, पुरस्कारार्थी यशोदाबाई गडाख, कॉ. स्मिता पानसरे, शिक्षणमहर्षी बा. ह. नाईकवाडी यांच्या पत्नी दुर्गाबाई नाईकवाडी यांसह तालुक्‍यातील सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेले पाच विद्यार्थी उपस्थित होते.

कॉ. पानसरे पुढे म्हणाल्या, “”आज देशातले व राज्यातले सरकार माणसांना दुसऱ्याच गोष्टीत गुंतवून ठेवत आहे. सरकारला फक्‍त गोमाता व गोमूत्र हेच प्रश्‍न आहेत. देशातली महागाई, बेकारी, गरिबी, दारिद्रय हे व अन्य प्रश्‍न या सरकारला दिसत नाहीत. प्रसारमाध्यमेही गोमाता, गोमूत्र हेच प्रश्‍न दिवसभर वारंवार दाखवतात. त्यामुळे लोकांच्या मनात संताप निर्माण होतो व लोकांचे इतर प्रश्‍नांकडे लक्ष जात नाही. या सरकारने तीन वर्षांत सांगण्यासारखे एकही काम केलेले नाही. फक्‍त निवडून येताना “अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. मात्र, आता कोणाचे अच्छे दिन आले ते दिसते आहे,” असा टोला त्यांनी लगावला. वामनदादा कर्डक यांनी एका कवितेत लिहिले आहे की “एकाने, हसावे, लाखोंनी रडावे’याचप्रमाणे आज मूठभर लोक हसत आहेत व कोट्यवधी लोक रडत आहेत, असेही त्या सरकारवर टीका करताना म्हणाल्या.

माजी मंत्री पिचड म्हणाले, “”तालुक्‍याला चळवळीचा इतिहास आहे. चळवळी प्रेरणेने व विचाराने घडत असत. या चळवळीतून तालुका घडविणाऱ्या पिढीची जाणीव पुढील काळात कायम रहावी यासाठी हा सोहळा प्रेरणादायी आहे. तालुक्‍यात पाण्याची व विकासाची जी कामे झालीत त्याला मी फक्‍त निमित्त आहे. तालुक्‍यातील जनतेनेच वेळोवेळी योग्य निवड केल्यानेच मला संधी मिळाली. त्यामुळे तालुक्‍यात झालेली कामे ही तालुक्‍यातील जनतेनेच केली आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)