काय खरे, काय खोटे?

आरोपीच्या वक्तव्यावर किती विश्‍वास ठेवायचा, हा प्रश्‍न सार्थ असला, तरी एखादा आरोपी काही मुद्दे मांडत असेल, तर त्याची सत्य-असत्यता तपासण्याची गरज असते. हेतूतः कर्जबुडवा (विलफुल डिफॉल्टर) असलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्‍सी यांच्यासह बड्या कर्जदारांनी बॅंकांच्या कर्ज भरण्याच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केले. कर्ज भरण्याऐवजी ते बुडवण्याची त्यांची वृत्ती एका दिवसात तयार झालेली नाही. गुन्हेगार कितीही अट्टल असला, तरी त्याला पकडण्याची आपल्या तपास यंत्रणांची ख्याती आहे. असे असताना मल्ल्या, मोदी, चोक्‍सी यांच्यासारखे बडे गुन्हेगार थेट परदेशात निघून जातात आणि आपल्या यंत्रणांना त्यांची माहिती होत नाही, यावर सहजासहजी विश्‍वास बसणे अवघड होते. मल्ल्या हा तर खासगी विमानाने पळून गेला आणि त्यांची गंधवार्ताही आपल्या देशांतील तपास यंत्रणांना असू नये, हे जरा आश्‍चर्यकारकच आहे. त्यातही ज्या काळात ते भारतीय तपास यंत्रणांना हवे होते, त्याच काळात हातावर तुरी देऊन ते पसार झाल्याने त्यांना पळून जाण्यात कुणीतरी मदत केली, अशी शंका घेतली जात होती. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर वारंवार भाजपच्या काही नेत्यांनीच बड्या कर्जबुडव्यांना देश सोडून जायला मदत केली, असे आरोप केले. विरोधक म्हणून राहुल यांच्या आरोपाकडे किती गांभीर्याने पाहायचे हा प्रश्‍न योग्य असला, तरी मोदी सरकारच्या काळात हे कर्जबुडवे फरार झाल्याने लोकांच्या मनातील शंका दूर करणे हे सरकारचे काम होते. आपल्याकडे परदेशातील विमाने रडारवर दिसतात आणि मल्ल्या यांचे विमान भारताबाहेर जाताना दिसू नये, हे जरा कोड्यात टाकणारेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योजकांचे मित्र आहेत, याचा अर्थ ते चुकीच्या उद्योजकांना पाठीशी घालत आहेत, असा नाही; परंतु ते त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून द्यायला हवे. नीरव मोदी हा ही परदेशातील एका कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत दिसत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. आरोपी सरकारच्या हेतूबद्दल साशंकता निर्माण करू शकतात. सरकारविषयीचा राग ते संभ्रम निर्माण करणारी विधाने करून तयार करू शकतात. हे गृहीत धरून सरकारने सर्व शंकांचे निराकरण करायला हवे. भारतीय बॅंकांना सुमारे नऊ हजार कोटींचा गंडा घालून विदेशात पळून गेलेला मद्य व्यापारी विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा केला आहे. तडजोडीसाठी आपण जेटलींची भेट घेतली होती. बॅंकांनी माझ्या तडजोडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत थकबाकी भरायला आपण तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. लंडन येथील वेस्टमिनिटस्टर न्यायालयात प्रत्यार्पणाबाबत सुनावणी सुरू आहे. त्या वेळी त्याने हा खळबळजनक दावा केला. या बैठकीबाबत विस्तृत माहिती देऊ शकत नसल्याचे मल्ल्याने पत्रकारांना सुनावणीनंतर सांगितले. मल्ल्या जेव्हा देश सोडून गेला, त्या वेळी जेटली अर्थमंत्री होते. तडजोडीबाबत बॅंकांना अनेकवेळा पत्र लिहिले होते; पण बॅंकांनी माझ्या पत्रांबाबतच प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत आपल्यावरील आरोप मल्ल्या याने नाकारले. अर्थात कोणताही आरोपी तेच करीत असतो. याबाबत न्यायालयच त्याच्यावरच्या आरोपाबाबत निर्णय घेणार आहे. भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याचा मल्ल्यांचा दावा जेटली यांनी फेटाळला आहे. विजय मल्ल्याचे वक्तव्य तथ्यात्मकरित्या पूर्णपणे खोटे आहे. 2014 पासून आतापर्यंत आपण मल्ल्या यांची भेट घेतलेली नाही किंवा कधी वेळही दिलेली नाही. त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपल्या ब्लॉगमध्ये जेटली म्हणाले, की, मल्ल्या जेव्हा राज्यसभा सदस्य होते, तेव्हा ते अपवादत्मकरित्याच संसदेत येत. ते एकदा संसदेच्या कामकाजावेळी अनौपचारिकत्या भेटीला आले. त्या वेळी त्यांनी तडजोडीसाठी एक प्रस्ताव तयार करत असल्याचे सांगितले. त्या वेळी जेटली यांनी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या प्रस्तावाची आठवण करून दिले. आपल्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी तडजोडीचे प्रस्ताव बॅंकांसमोर ठेवले पाहिजेत, असा सल्ला जेटली यांनी दिला होता. मल्ल्या यांनी आणलेली कागदपत्रेही त्यांनी घेतली नाहीत. मल्ल्या यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा गैरफायदा घेत माझी भेट घेतली होती. याप्रकरणी मी त्यांना वेळ देण्याचा प्रश्नच नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. जेटली यांचे स्पष्टीकरण त्यांच्या जागी योग्य असेलही; परंतु त्यातून अनेक प्रश्‍न अनुत्तरीत राहतात. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी खासदार असलेल्या मल्ल्या यांचे म्हणणे ऐकून ते जर काही थकबाकी भरायला तयार होते, तर त्यांनी बॅंकांना सांगून तेवढी तरी थकबाकी किमान भरून घेऊन पुढची कारवाई सुरू ठेवायला सांगणे आवश्‍यक होते. दहा हजार कोटी रुपयांना फटका बसण्याऐवजी किमान काही रक्कम तरी वसूल झाली असती. मल्ल्या परदेशी पळून जाण्याअगोदर भेटला, की त्याच्या फार अगोदर भेटला, यावर काथ्याकुट करण्यापेक्षा त्या भेटीतून भोपळा हाती लागला, असा तिचा निष्कर्ष आहे. राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे आता या भेटीची चौकशी करून वस्तुस्थिती समोर ठेवायला हवी. तसे केले नाही, तर जनतेच्या मनात संशय कायम राहील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)