काय आहे सांधेहृदयताप? (भाग २)

डॉ. श्‍याम अष्टेकर

सांधेहृदयताप हा आजार खूप विचित्र आहे. यात एका विशिष्ट जिवाणूंमुळे घशाला सूज येते. काही काळाने याचाच पुढचा भाग म्हणून सांधे व हृदयाला सूज येते. यातूनच पुढे हृदयाच्या झडपांचे आजार तयार होतात. सांधे आणि हृदय या दोन्ही वेगवेगळया अवयवांना होणारा आजार म्हणून आपण या आजाराला सांधेहृदयताप म्हणू या. हा एक दीर्घकालीन आजार आहे. यांत सांधेसूज कालांतराने थांबते पण हृदयाला कायमची इजा होते.

याबरोबर पायावर सूज येते, कारण रक्तप्रवाह मंद झाल्यामुळे रक्तातील पाणी सूक्ष्म केशवाहिन्यांबाहेर पडते. पाय हा शरीराचा सर्वात खालचा भाग असल्याने ही सूज पायांत दिसते. रक्तातल्या वायूची श्‍वसनसंस्थेत जी देवाणघेवाण होते त्यात अडथळा होतो. यामुळे रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जीभ व नखे निळसर दिसतात.
रक्त साठल्यामुळे यकृत व प्लीहा नेहमीपेक्षा मोठे होतात व नंतर जलोदर होतो. काही काळाने रक्तप्रवाह मंद झाल्याने फुप्फुसात पाणी जमते. अशावेळी आवाजनळीने तपासल्यास फुप्फुसाच्या खालच्या भागात सूक्ष्म बुडबुडयांचे आवाज (क्रेप) ऐकू येतात.

-Ads-

सुरुवातीला 2-3 वर्षात सांधेदुखी मात्र आपोआप बरी होते. नंतर त्याचा काहीही परिणाम उरत नाही. अनैच्छिक हालचालीही आपोआप बंद होतात, फक्त हृदयावरचे परिणाम कायम राहतात. रुग्ण विशेष करून झडपांच्या बिघाडाच्या वेळी औषधोपचारासाठी येतो, कारण बऱ्याच वेळी ताप व सांधेसूज हे जुजबी असतात. ही दुखणी अंगावर काढणे शक्‍य असते, पण नेमकी चूक इथेच होते. झडपा खराब झाल्या, की शस्त्रक्रियेने त्या बदलाव्या लागतात. ही नाजूक, धोक्‍याची व महागडी शस्त्रक्रिया न झाल्याने अनेक रुग्ण दगावतात.

तापाबरोबर सांधेसूज, हृदयसूज (झडपांचे बिघडलेले आवाज) याबरोबरच रक्ततपासणीवर निदान अवलंबून असते. योग्य उपचारांसाठी जोड लक्षणावरून लवकरात लवकर हा आजार ओळखणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. शाळकरी वयात ताप आणि बदलती सांधेदुखी या वरून ताबडतोब शंका घेऊन आपण डॉक्‍टरकडे पाठवावे. उपचार या आजारात पूर्ण विश्रांती, पेनिसिलीन इंजेक्‍शन, ऍस्पिरिन, इत्यादी औषधोपचारांची गरज असते.

महत्त्वाचे म्हणजे पुढे घसासूज-सांधेदुखी येऊ नये म्हणून दर महिन्यास पेनिसिलीनचे एक इंजेक्‍शन द्यावे लागते. यामुळे झडपांचे नुकसान टळू शकते. सांधेहृदय तापामुळे झडपांचे नुकसान टाळण्यासाठी दर महिन्याला पेनिसिलीनचे इंजेक्‍शन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण सांधेहृदयतापाचे समाजातले प्रमाण कमी होण्यासाठी राहणीमान सुधारणे हाच सर्वात परिणामकारक उपाय आहे.

आता हृदयवेदनेबद्दल जाणून घेऊ या. छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत. – उदा. स्नायू किंवा बरगड्यांना इजा, जठरातील आम्लता,न्यूमोनिया आणि हृदयविकार. ही वेदना साध्या दुखण्यापासून तीव्र कळेपर्यंत कोणत्याही स्वरूपाची असू शकते. हृदयवेदना म्हणजे खरे तर हृदयविकाराचा पहिला टप्पा असतो. हृदयवेदनेचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे विशिष्ट श्रमाने निश्‍चितपणे जाणवणारी म्हणजे सश्रमहृदयवेदना. ही वेदना आणि विश्रांतीने थांबते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)