काय आहे रेटिनोब्लास्टोमा रोग?

संग्रहित फोटो

जागतिक रेटिनोब्लास्टोमा सप्ताह 13 ते 19 मे


डोळ्यातले पांढरे चिन्ह मुलांच्या डोळ्यातील कॅन्सरचे लक्षण?

गेल्या काही वर्षात रेटिनोब्लास्टोमा रोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अर्भके आणि बालकांच्या डोळ्यांविषयी असलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन, त्यांची तपासणी करण्याचा सल्ला सर्वच डॉक्‍टरांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे बालपणातील अंधत्वापासून मुलांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वेळीच उपाययोजना करता येऊ शकतात.

रेटिनोब्लास्टोमाबाबात जनजागृती करण्यासाठी मे महिन्यात (13 ते 19 मे) जागतिक रेटिरोब्लास्टोमा सप्ताह पाळण्यात येत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष करून नये यासाठी व्यापक प्रमाणात जागृती संदेश देण्यात येत आहे. ते आवश्‍यकच आहे, कारण पालक आणि काही आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनाही याबाबत पुरेशी माहिती आणि जाणीव नाही. रेटिनोब्लास्टोमा (आरबी-दृष्टीपटलातील पेशींची सामान्य वाढ न झाल्याने होणारा कर्करोग) हा नवजात आणि पाच वर्षांपर्यतच्या मुलांमध्ये होणारा जीवघेणा रोग आहे.

तो एका किंवा दोन्ही डोळ्यांना होऊ शकतो. हा घातक आजार असला तरी, त्याचे लवकर निदान झाल्यास मुलांची त्यातून सुटका होऊन दृष्टी सुधारू शकते. विविध अभ्यास अहवालांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी 8000 जणांना हा आजार होतो, त्यामध्ये भारतातील रुग्ण बालकांचे प्रमाणे 1500 आहे. तथापि, अनेक ठिकाणी अशा रुग्णांची नोंद न होण्याचे आणि त्यावर उपचारच न मिळाल्याचे प्रमाणही मोठे आहे. विशेषत: ग्रामीण भागात त्याविषयी खूपच कमी माहिती आहे.

रेटिनाब्लास्टोमाचे लवकर निदान होत नाही. तरीही, डोळ्यातील पांढरा चमकणारा ठिपका, सतत बारीक होणारे डोळे, सूज यासारख्या काही लक्षणांच्या आधारे त्याचे निदान होऊ शकते. हा पांढरा ठिपका काही दिवसांनंतर कायमस्वरूपी होऊन जातो. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पुढे डोळ्यांमध्ये वेदना होऊन डोळे लाल होतात आणि सूज येते. त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर, हा कॅन्सर डोळ्याच्या बाहेरील भागात पसरतो. काही दिवसांनंतर तो मेंदूकडे किंवा शरीराच्या अन्य भागात जाऊन आयुष्याला धोका निर्माण करतो.

सध्या रेटिनोब्लास्टोमाविषयी जनजागृती खूपच कमी आहे आणि वेळीच निदान झाल्याने मुलांचे जीवन, डोळे आणि दृष्टी वाचविता येऊ शकतात. लवकर निदान आणि योग्य उपचार यामुळे 95 टक्के मुलांनी या आजारावर मात केली आहे तर, 90 टक्के जणांनी त्यांचे डोळे, 85 टक्के जणांनी त्यांची दृष्टी वाचवली आहे. डोळ्यांची अतिशय मोठी समस्या निर्माण झाली तरच नेत्रतज्ज्ञांकडे जाण्याची आपली मानसिकता आहे. अशा स्थितीमध्ये रेटिनोब्लास्टोमाचे निदान झाल्यास त्यावर उपचार करणे अवघड असते. त्यावर मात करण्यासाठी, बालकं किंवा अर्भकांमध्ये काही दोष नाहीत ना, याची तज्ज्ञांकडून खात्री करून घेणे फायद्याचे ठरते.

आरबी हा बहुतांश मुलांमध्ये अनुवांशिकतेने येतो. माता-पित्यांनी याविषयी माहिती घ्यावी. त्यामुळे त्यांच्या मुलांना वेळीच उपचार मिळू शकतील. त्याबरोबरच नवजात बाळाच्या दृष्टिपटलाचा फोटो घेऊन नेत्रतज्ज्ञांकडून या आजारांच्या लक्षणांबाबत खात्री करून घ्यावी. यामध्ये मातेची भूमिका महत्त्वाची ठरते. तिला बाळाची काळजी घेताना, त्याच्या डोळ्यांमध्ये काही वैगुण्य जाणवल्यास त्वरीत तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आपल्याला नोंद झालेल्या रेटिनोब्लास्टोमाची माहिती आहे, मात्र नोंद न झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्याबाबत वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर जनजागृती करणे, ही काळाची गरज आहे. कारण, भारतात रोज जन्मणाऱ्या चार मुलांना जन्मत:च डोळ्यांचा कर्करोग असतो. त्यातील एकाचा मृत्यू निदान न झाल्याने किंवा उशीरा निदान झाल्याने होतो.

डॉ. सोनल चौगुले 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)