कायम ठेव अर्थात फिक्‍स्ड डिपॉझिट

पुणे म्हटलं की पीएमटी आणि पीएमटी म्हणजे सार्वजनिक प्रवास, पुण्यात सीटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव साधारण सारखाच. आपल्याला जी बस हवी ती वेळेवर येत नाही. दुसऱ्या अनेक बसेस येतात पण जिची आतुरतेने वाट पहात असतो ती आपल्याला ताटकळत ठेवते.

आली तर बस थांब्यावर थांबत नाही आणि थांबली तर त्यात मुंगीलाही पाय ठेवायला जागा नसते. प्रचंड कसरत करून बसमध्ये प्रवेश मिळवावा लागतो अन्‌ चला आताचा दिवस जाण्यापुरता निदान पार पडला म्हणून हुश्‍श्‍य करून एक सुस्कारा टाकला जातो. परतीच्या प्रवासाचं संध्याकाळी पुन्हा बघू… होय हाच अनुभव असतो. त्यातल्या त्यात आता काही मार्गावर बीआरटी सुरू केल्यामुळे बस थांबण्याची खात्री असली, तरी गर्दीचा प्रश्‍न असतोच.

-Ads-

अशा खचाखच भरलेल्या पीएमटीमध्ये सापडतं कसं घबाड? हो! एकदा नव्हे, अनेकदा हा अनुभव आला आणि क्षणभर कुठेतरी स्वतःचा सार्थ अभिमान वाटला. स्वतः एक प्राथमिक शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान. पीएमटीतील विविध व्यवधान घेऊन प्रवास करणाऱ्या साऱ्या प्रवाशांनाही तो “क्षण’ गहिवरून टाकणारा ठरला. दुपारची वेळ. उन्हाचा कडाका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणं गरजेचं होतं. त्यातून आजच्या तरुणवयात बायकांनी गाडी म्हणजे “दुचाकी’ चालवण्याचं फॅडच नव्हते.

नव्हे ते जरा आगाऊपणाचं मानलं जायचं. अन्‌ आता केव्हा शिकणार म्हातारपणात? यामुळे एकमेव वाहन पीएमटी. हवी ती बस आली. बसमध्ये घुसले असं म्हणण्यापेक्षा ढकलले गेले. अन्‌ तोल सांभाळण्यासाठी एका दांड्याला पकडलं. पाय ठेवायला जागा नाही, अशी अवस्था होती. अशा वेळी भरल्या गर्दीत कानावर कोणाचा तरी आवाज पडला, “”मॅडम तुम्ही? या, या इकडे, इथं बसा।” सगळेच अवाक्‌! नुसताच आवाज नाही, तर लगोलग कृतीही. 24/25 वर्षे वयाची एक सुंदर रुबाबदार युवती पुढे आली.

इतक्‍या गर्दीतही वाकण्याचा प्रयत्न करत तिने नमस्कार केला आणि म्हणाली, “”आमच्या मॅडम आहेत या. त्यांनी नुसतंच वर्गातले धडे नाही शिकवले, तर जीवनातील समस्याचं निराकरण करण्याचं धाडस दिलं, निर्णय घेण्याची क्षमता दिली. थोरामोठ्यांचा आदर करण्याचं व्रत दिलं. हसत जगण्याचं न संपणारं रसायन आमच्यात भरलं” एवढ्या गर्दीत एवढी चार/पाच वाक्‍य बोलत ती मुलगी मला तिच्या जागेपर्यंत घेऊन गेली. खाली बसवलं, चौकशी केली. म्हणाली, “”मॅडम, तुमचे संस्कार आज मला इथपर्यंत घेऊन आले आहेत!”सारे प्रवासी थक्क.

अगदी कृतार्थ वाटलं मला. कुठला अशील वकिलाला बसायला अशी आपली जागा देतो? कुठला रुग्ण डॉक्‍टरला ओळख देऊन एवढ्या आदराने वागवतो आणि तेही 15/20 वर्षांनी भेटल्यावर. धन्य वाटलं, शिक्षक असल्याबद्दल. गाठीला फार धन नसेल, पण आज असंख्य विद्यार्थी समाजात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पदावर काम करतात.

भेटल्यावर आवर्जून सांगतात, “”मॅडम तुमच्यामुळे घडलो.” हे विद्यार्थी म्हणजे शिक्षकाच्या गाठी असलेली कायमची ठेव. प्रचंड आश्‍वासक. चक्रवाढीने आनंद देणारी ही ठेव मिळायला भाग्यच लागतं. ते मला भरभरून मिळाले आहे.

सुनंदा जोशी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)