कायम टिकतील का लिव्ह-इन नाती?

लिव इन रिलेशनशिपला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. याचा अर्थ कायद्याने विवाह न करता एकत्र रहाणारे स्त्री-पुरुष यांच्यातील नातेसंबंध आता कायदेशीर होतील. सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीतूनच आला आहे; परंतु अशा प्रकारच्या संबंधामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीकडून आलेल्या शिफारशीनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप मिळत आहे.

लिव इन रिलेशनशिपमध्ये काही काळानंतर दुरावा निर्माण झाल्यास किंवा दोघांमध्ये मतभेद होऊन वेगळे राहण्याची वेळ आल्यास त्या महिलेला पोटगी देण्याची तरतूद देखील कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारच्या संबंधामुळे राज्याच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेवर काही परिणाम होईल का, याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे.

-Ads-

‘लिव इन रिलेशनशिप’ योग्य की अयोग्य हे ठरवताना सुरुवातीला समाजाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण आपल्याकडे समाज हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणतीही गोष्ट करताना आपण पहिल्यांदा लोकांचा विचार करत असतो. समाज, लोक काय म्हणतील? असा प्रश्न नेहमी असतो. जर समाजाने अशा प्रकारच्या संबंधाला मान्यता दिली तर ‘लिव इन रिलेशनशिप’ ठेवण्यास काहीही हरकत नाही. पण लिव इन रिलेशनशिप ही काळाची गरज आहे, असे वाटत नाही. आपल्या सोयीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, हे तितकेच खरे!

एका स्त्रीशी लग्न झाले असताना दुसरीबरोबर संबंध ठेवणे, हे एक प्रकारे “लिव इन रिलेशनशिप’च मानायला हवे. जर आपण नैतिकतेचा विचार केला तर समाजाने अशा संबंधाला कधीच मान्यता दिलेली नाही. कारण, आपल्याकडे दोन पत्नी करण्यावर कायद्याने बंदी आहे. लिव्ह-इनमध्ये दुसऱ्या स्त्रीला पत्नीचा दर्जा दिला जाणार असल्याने आधीच्या कायद्याचा हा भंग आहे. या संबंधाला कायदेशीर मान्यता मिळाल्यास लग्न न करता एकत्र राहणाऱ्यांनाही कायदेशीर मान्यता मिळू शकेल. मात्र, त्याला समाजाचीही मान्यता लागेल.

माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे तो आपले कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींचा नेहमी विचार करत असतो. म्हणून लिव इन रिलेशनशिपला त्यांची मान्यता मिळवावी लागेल. जर त्यांनीच विरोध केला तर त्यातून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अशा प्रकारच्या संबंधातून नंतर आपल्याला मुले झाली तर त्यांचे काय? हा एक मोठा प्रश्न आहे. त्या महिलेला आणि अपत्यांना संपत्तीत वाटा मिळणार की नाही? अशा प्रकारे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. या सर्वांचा विचार करूनच लिव इन रिलेशनशिपला मान्यता देण्यात यावी असे वाटते. विवाह म्हणजे दोन कुटुंब, समाज आणि दोन संस्कृतीचे मीलन मानले जाते. नेमका हाच फरक लिव इन रिलेशनशिपमध्ये आहे. यामध्ये आपल्यावर जबाबदारी असते. लिव इन रिलेशनशिपमध्ये ती नसते. कारण, “पटलं तर एकत्र रहा; नाहीतर विभक्त व्हा’ असा हा मामला आहे.

हे सर्व काही असले तरी लिव इन रिलेशनशिपमुळे संस्कृतीला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही, असेही दुसरीकडे वाटते. कारण, आपल्या संस्कारातून संस्कृती घडत असते. आपल्याकडे विविध पद्धतीने विवाह केला जातो. त्यामुळे आपोआपच एका संस्कृतीवर दुसऱ्या संस्कृतीचा प्रभाव पडत असतो. म्हणून लिव इन रिलेशनशिप अशाच प्रकारचे नाते आहे.

– अर्चना गोडांबे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)