कायद्यापुढे आव्हान अंधश्रद्धेचे (भाग-१)

चेटूक किंवा काळी जादू करीत असल्याच्या संशयावरून पुण्याजवळ औंध येथे एका महिलेचा आणि तिच्या पतीचा जमावाकडून खून करण्यात आला. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानात आपण आघाडी घेतली असून, विकासाच्या वाटेवर अनेक देशांना आपल्या अर्थव्यवस्थेने मागे टाकले आहे. अशा देशातील समाजात आजही अंधश्रद्धा इतक्‍या खोलवर रुजलेल्या असाव्यात, याचे वैषम्य जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार. महाराष्ट्रासारख्या अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात पुढाकार घेऊन कायदा करणाऱ्या राज्यात अशा घटना घडत असतील तर अन्य राज्यांत काय परिस्थिती असेल याचा विचारच न केलेला बरा!

पुण्याजवळ औंधमध्ये एका महिलेची आणि तिच्या पतीची झालेली हत्या ही केवळ गुन्हेगारी स्वरूपाची घटना नाही. हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचाही विषय नाही. एकविसाव्या शतकात गतिमान तांत्रिक प्रगती होत असताना आणि विकासाच्या वाटेवर आपली अर्थव्यवस्था अनेक देशांना मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहोचली असताना आजही आपल्या समाजाचा दृष्टिकोन किती बुरसटलेला आहे, हे दाखवून देणारी ही घटना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि सुधारणांचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा किती खोलवर रुजल्या आहेत, हे पाहून थरकाप उडावा, अशी ही घटना आहे. मृत दाम्पत्यातील पत्नी ही काळी जादू करते, अशी शंका लोकांना होती. त्यातूनच या दाम्पत्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. हल्लेखोरांपैकी एकाच्या मुलीच्या पोटात गाठ आली होती आणि हा त्या महिलेच्या काळ्या जादूचाच परिपाक आहे, अशी त्याची ठाम समजूत होती. विकासाच्या वाटेवर आपण कितीही वेगात धावत असलो, तरी आपल्या समाजातील अनेकांची पाळेमुळे अंधश्रद्धांच्या चिखलात खोलवर रुतून बसलेली आहेत. अशा अंधश्रद्धांपोटी माणसे हत्येसारखा गुन्हा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आपण काय करतो आहोत आणि त्याचे परिणाम काय होतील, याचाही सारासार विवेक हरवला आहे की काय, अशी शंका या घटनेवरून येते.

कायद्यापुढे आव्हान अंधश्रद्धेचे (भाग-२)

-Ads-

पोलिसांनी या प्रकरणातील दोन संशयितांना अटक केली आहे. हल्ला करणाऱ्या सर्वांनाच अटक होईल, खटला चालेल, शिक्षाही होईल. परंतु मुख्य प्रश्‍न असा की, गतिमान प्रगतीचा दावा आपण कोणत्या आधारावर करीत आहोत? देशभरातील असंख्य व्यक्तींना, त्यातल्या त्यात महिलांना अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना आजही मोठ्या संख्येने बळी पडावे लागते, हे आपले दुर्दैव होय. केवळ अगतिकतेमुळेच माणसे अंधश्रद्धांच्या आहारी जात आहेत, असे म्हणावे तर गुप्तधनाच्या प्राप्तीसाठी नरबळी देण्याच्या घटनाही राज्यात अजून घडत आहेत.

– विश्‍वास सरदेशमुख 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)