कायद्याच्या पदवीनंतर… 

– वनिता कापसे 

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, समाजातील, कुटुंबातील प्रश्‍न सोडवण्यासाठी बहुतांश मंडळी कायद्याचा अभ्यासक्रम निवडतात. कुटुंबातील कायदेशीर वाद, दोन संस्थांमधील व्यवहाराचे वाद आदी गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी कायद्याचे पदवीधारक मदत करू शकतात. ही पदवी मिळाल्यानंतर पारंपारिक करियर करता येऊ शकते. न्यायालयात वकिली करून करियरचा मार्ग निवडता येतो. याशिवाय जेएमएफसीच्या परीक्षा देऊन न्यायधीश होता येते. सरकारी वकील, दिवाणी वकिल, फौजदारी वकिल या वकिली व्यवसायातील श्रेणी असून सरकारी वकिली करणे देखील कायद्याच्या करियरमध्ये आपल्याला उंचीवर नेणारे ठरते. मात्र कायद्याचा अभ्यास करून पारंपारिक करियर करण्यापेक्षा आणखी काही क्षेत्र आहेत की, ते कायद्याच्या पदवीधारकाचे करियर उज्ज्वल करू शकतात. 

हायस्कूल टिचर : 
कायदेविषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळा या आपल्याला सरकार कसे चालते, कायदे कसा निर्माण होतात, कायद्याची अंमलबजावणी कशी होते, कायद्यातील तरतुदी कशा आहेत, कोणत्या गुन्ह्यासाठी कोणता कायदा याबाबतचे प्रशिक्षण देतात. बारावीपर्यंत काही संस्थांमध्ये कायदेविषयक अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. जर आपल्याला अध्यापनात रुची असेल तर आपण कायदेशीविषयक अभ्यासक्रम शिकवण्याचे काम करू शकतात. कायद्याची पदवी घेऊन शिक्षक होणे फारसे अवघड नाही. यासाठी पुन्हा बीएड, डीएडची वेगळी पदवी घेण्याची गरज नाही. जर आपल्याला अध्यापनाचे कार्य करायचे असेल तर कायदेविषयक अभ्यासक्रम प्राप्त शैक्षणिक संस्थांची माहिती मिळवा आणि तेथे अर्ज करा. याशिवाय खासगी शाळा, संस्थांमधूनही कायद्याचे प्राथमिक शिक्षण देण्याचे काम केले जाते.

अभ्यासक्रम विशेषज्ञ : 
जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात रुची असेल, परंतु वर्गात शिकवणे आवडत नसेल तरीही आपण कायद्याचे अभ्यासक, कायदेतज्ञ म्हणून नावारूपास येऊ शकतात. अशा प्रकारचे अभ्यासक, विशेषज्ञ कायद्याचा अभ्यासक्रम निर्मितीसाठी मोठा हातभार लावतात. किचकट कायदे सुटसुटीत करुन सांगण्यासाठी अभ्यासक महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी काही स्वयंसेवी संस्था कायदेविषयक माहिती देणाऱ्या पुस्तिका सतत प्रकाशित करत असतात. अशा ठिकाणी आपण अभ्यासक म्हणून मार्गदर्शन करू शकतो.

कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर, अभ्यास शिबिर याठिकाणी कायद्याची माहिती देऊ शकतो किंवा पुस्तक रुपाने लोकांपर्यंत सादर करू शकतो. कायद्याचे अभ्यासका स्वयंसेवी संस्थांशी संलग्न राहून कायदेशीर सल्ला देण्याचेही काम करू शकतात.सामाजिक-न्याय, स्थलांतरितांचा कायदा, नागरी हक्क, नागरी करार आदी विषयक अभ्यासक म्हणून वावरू शकता. कायद्याचे विश्‍लेषक: कायद्याची पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्याला वकिली करायची नसेल, न्यायालय क्षेत्रात जायचे नसेल किंवा अध्यापनाचे कामही करायचे नसेल तर कायद्याचे विश्‍लेषक म्हणूनही आपण करियर करु शकतो. पर्यावरणविषयक कायदा, महिलांचे हक्क, स्थलांतरित नागरिकांचे हक्क आणि अधिकार या मुद्‌द्‌यावरून अनेक स्वयंसेवी संस्था सरकारकडे मागण्या मांडत असतात. अशावेळी स्वयंसेवी संस्थांना कायद्याचे विश्‍लेषण करणाऱ्या तज्ञांची गरज भासते. स्वयंसेवी संस्थांची भूमिका सरकारदरबारी मांडण्यासाठी विश्‍लेषक मोलाचा ठरतो. याशिवाय स्पर्धात्मक परीक्षा देऊनही विविध विभागात कायदेशीर सल्लागार म्हणून काम करु शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)