कायदाविश्व: कन्येचा राहत्या घरासंबंधी वारसाधिकार

सीताराम हे गावातील खातेदार मृत्यूपत्र न करता मयत झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मिळकतीचे कुटुंबीयांमध्ये कायदेशीर नोंदणीकृत वाटप करण्यात आले. मयत सीतारामची एक विधवा कन्या अलका ही मयत सीतारामच्या घरातच रहात होती. वाटपामध्ये मयत सितारामच्या विधवा कन्येला तिच्या हिश्‍यासह मयत सीतारामच्या घरात रहाण्याचा हक्क देण्यात आला होता.

सदर नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना 6 मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यावर मयत सीतारामची सून रखमा ही तलाठी यांच्याकडे सदर वाटप नोंदीविरूध्द तोंडी हरकत घेऊन आली.

-Ads-

योगायोगाने मंडलअधिकारी तलाठी चावडीतच होते. त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता, रखमाने सांगितले की, मयत सीतारामच्या विधवा कन्येला, म्हणजेच अलकाला जो मयत सीतारामच्या घरात राहण्याचा हक्‍क देण्यात आला आहे, त्याविरुद्ध तिची तक्रार आहे. सीतारामच्या मृत्य्‌ूनंतर झालेल्या मिळकतीच्या वाटपात अलकाला तिचा हिस्सा मिळाला आहे. त्यामुळे आता अलकाला सीतारामच्या घरात रहाण्याचा काहीही हक्क नाही. त्यामुळे या वाटपाला तिची (रखमाची) हरकत आहे.

मंडलअधिकारी यांनी लगेच, हिंदू उत्तराधिकार अधिनियम-1956 चे पुस्तक मागवले आणि त्यातील कलम 23 चे मोठ्याने वाचन केले. त्यात नमूद होते की, ‘जर अकृतमृत्यूपत्र व्यक्तीला वारसदार कन्या असेल आणि जर ती अविवाहित असेल किंवा तिच्या पतीने तिला सोडून दिले असेल; अथवा ती पतीपासून विभक्‍त झाली असेल किंवा ती विधवा असेल आणि ती अकृतमृत्यूपत्र व्यक्‍तीच्या घरात राहत असेल तर तिला राहत्या घरात राहण्याचा अधिकार प्राप्त होईल.’

ही तरतूद वाचल्यानंतर मंडलअधिकारी यांनी रखमाला सांगितले की, ‘मयत सीतारामच्या विधवा कन्येला, अलकाला, त्याच घरात राहण्याचा तसा कायदेशीर अधिकार आहे, यानंतरही तुमची त्यावर काही हरकत असेल तर ती हरकत लेखी द्या.’

कायदेशीर तरतूद ऐकून रखमाला पुढे काहीच बोलता आले नाही. तिने तिथून निघून जाणे पसंत केले.

(संदर्भ : हिंदू वारसा कायदा 1956, कलम 23 ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 149 व 150.)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)