काम सोपे नाही (अग्रलेख)

चार वर्षांपूर्वी मोदी यांची “अच्छे दिन आयेंगे’ ही घोषणा टाळ्या घेणारी ठरत होती. तीच घोषणा आता चेष्टेचा विषय झाली आहे. चार वर्षापूर्वी मोदी यांना टक्‍कर देऊ शकेल, असा नेता नाही, अशी भावना होती. आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रूपाने मोदी यांना दमदार विरोधक मिळाला आहे. गेल्या निवडणुकीवेळी अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपशी मैत्री केली होती. आज भाजपचे अनेक मित्र त्यांना सोडून गेले आहेत. 
नवी दिल्ली येथे झालेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारच्या बैठकीत सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी “अजेय भाजप’ ही नवीन घोषणा केली गेली आणि आगामी काळातील सर्व निवडणुका अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यासाठी त्यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदतही वाढविण्यात आली. देशात इंधन दरवाढ आणि इतर अनेक विषयांवरून सरकारच्या विरोधात नाराजीची तीव्र भावना निर्माण झाली असल्याने “अजेय भाजप’ ही घोषणा प्रत्यक्षात आणणे सोपे नाही, याची कल्पना शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनीही असणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेत, सन 2014 पेक्षा अधिक बहुमताने सरकार स्थापन करण्याचा संकल्पही भाजपने केला आहे. या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह काही राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचाही संकल्प करण्यात आला. अर्थात, संकल्प आणि वास्तव यात खूप फरक असतो हे शहा आणि मोदी यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. इंधनाच्या दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी आज 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची “अजेय भाजप’ ही घोषणा सध्यातरी मृगजळच वाटत आहे. सन 2014 मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या होत्या आणि त्यात पक्षाला घवघवीत यश मिळाले.
भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे गेल्या चार वर्षात सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी हे निर्णय महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव देऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केलेली आहे. हे निर्णय घेऊन भाजप मतदारांसमोर जाणार असेल, तर पक्षाला तोंडघशीच पडावे लागेल. कारण या सर्व निर्णयांमधील फोलपणा आता समोर आला आहे. नोटाबंदी फसल्याची माहितीही उघड झाली आहे आणि जीएसटीचा फटकाही अनेकांना बसला आहे. शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयांचा संपूर्ण फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही, हे वास्तवही समोर आले आहे. अशा परिस्थितीत “अजेय भाजप’ची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा कालावधी असला, तरी या वर्षाच्या अखेरीस होणारी चार राज्यांची विधानसभा निवडणूक शहा यांच्यासाठी “लिटमस टेस्ट’ ठरणार आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे आणि मिझोरमध्ये कॉंग्रेस सत्तेत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ता असलेल्या राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा फटका बसल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो, याची कल्पना भाजपला असणार आहे. राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताबदलाची परंपरा असल्याने, भाजपला यावेळी मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. इथल्याही पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा फटका बसला आहे. छत्तीसगडमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेसच्या मतांमध्ये फार काही अंतर नसते. त्यामुळे इथेही भाजपला झगडावे लागणार आहे.
मिझोरमची सत्ता हस्तगत करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. पण तो प्रयत्नही कितपत यशस्वी होईल, याची शंका आहे. चार वर्षांपूर्वी मोदी यांची “अच्छे दिन आयेंगे’ ही घोषणा टाळ्या घेणारी ठरत होती. तीच घोषणा आता चेष्टेचा विषय झाली आहे. चार वर्षापूर्वी मोदी यांना टक्‍कर देऊ शकेल, असा नेता नाही, अशी भावना होती. आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रुपाने मोदी यांना दमदार विरोधक मिळाला आहे. गेल्या निवडणुकीवेळी अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपशी मैत्री केली होती. आज भाजपचे अनेक मित्र त्यांना सोडून गेले आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना हे महत्त्वाचे मित्र आता विरोधकांचे काम करून लागले आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांनीही स्वबळाची भाषा केल्याने त्यांची मैत्रीही भाजपला मिळणार नाही.
नवीन मित्र निर्माण होण्याची शक्‍यताही नाही. साहजिकच वेगळ्या अर्थाने भाजपला “शतप्रतिशत भाजप’ ही मोहीम राबवावी लागणार आहे. दुसरीकडे, महाआघाडीच्या निमित्ताने विरोधकांची एकी पुन्हा एकदा दिसू लागली आहे. “भाजपचा पराभव’ या एकमेव हेतूने विरोधक एकत्र येत असल्याने त्याला तोंड कसे द्यायचे, याचा विचारही भाजपला करावा लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, “अजेय भाजप’ घोषणेबाबत शंका येणे साहजिकच आहे. काही वर्षापूर्वी भाजपने सत्तेवर असतानाच, पुन्हा सत्तेवर येण्याच्या हेतूने, “शायनिंग इंडिया’ची घोषणा केली होती. पण त्या घोषणेनंतर भाजपला सत्ता गमवावी लागली होती आणि त्यानंतर 15 वर्षे सत्तेपासून वंचित राहावे लागले होते.
आता “अजेय भाजप’ घोषणेलाही पराजयाचा फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात, कोणताही राजकीय पक्ष आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाकांक्षी संकल्प करीत असतो आणि आम्हीच सत्तेवर येणार असा दावा करीत असतो. कार्यकर्त्यांना बळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात. पण ते करताना थोडेफार वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे असते, इतकेच.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)