कामशेत पोलीस ठाण्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

कामशेत – कामशेत पोलीस ठाण्यात अपुऱ्या मनुष्य बळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्‍त ताण येत आहे; त्यामुळे पोलिसांमध्ये उदासिनता पहावयास मिळत आहेत.

तीन वर्षांपूर्वी कामशेत पोलीस ठाण्याची एका छोट्या चौकीत स्थापना करण्यात आली. त्यावेळी या पोलीस ठाण्यास 55 पोलीस कर्मचाऱ्यांची मंजुरी देण्यात आली होती. मात्र पोलीस ठाण्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत एकदा देखील मंजूर कर्मचारी संख्या पूर्ण करण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यश आलेले नाही. सध्या कामशेत पोलीस ठाण्यात 37 कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचा व्याप मोठा असल्याने हे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 43 गावे 9 किलोमीटर लांबीचा जुना पुणे-मुंबई महामार्ग, 11 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग, मावळातील सर्वात मोठी कामशेत बाजारपेठ, वडिवळे व शिरोता अशी दोन मोठी धरणे, राजमाची किल्ला, ऐतिहासिक बौद्धलेणी अशी अनेक पर्यटन स्थळे व सातत्याने शहरीकरण वाढणारे कामशेत शहर येते व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्‍त 37 कर्मचारी काम करत असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारा द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई महामार्ग यावर वारंवार किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असतात. तसेच चोऱ्या व लुटमार यांसारखे प्रकार देखील या मार्गांवर घडत असल्याने पोलिसांना महामार्गावर पेट्रोलिंग करण्यासाठी जास्त मनुष्यबळ वापरावे लागत आहे.
तसेच अपघातातील तपास दैनंदिन घडणारे गुन्हे व ग्रामीण भागातील 40 गावे याकडे पोलिसांना लक्ष देणे अशक्‍य होते. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे अवघड जात आहे. परिणामी त्यांच्यावर कामाचा अतिरिक्‍त ताण येत आहे.

कामशेत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खून, दरोडे, बेवारस मृतदेह, चोऱ्या, घरगुती भांडणे,अपघात असे अनेक गुन्हे घडत असल्याने कामशेत पोलीस ठाणे एक संवेदनशील पोलीस ठाणे झाले आहे. पूर्वी कामशेत पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षक असे पाच प्रमुख अधिकारी व अन्य कर्मचारी या पोलीस ठाण्याचा कार्यभार संबाळत होते.

सध्या मात्र पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षक असे तीनच अधिकारी आहेत. यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासाचा ताण देखील कर्मचाऱ्यांवर येतो आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर कामशेत पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढविण्याची मागणी नागरिक करत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळ असताना देखील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ जगताप हे होमगार्ड, ट्राफिक वार्डन, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्र यांचा पुरेपूर वापर करून त्यांच्या मदतीने ग्रामीण भागातील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत असतात.

कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक पर्यटन स्थळे असल्याने व दोन महामार्ग, बाजारपेठ असल्याने या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनुष्यबळ महत्वाचे असते; पण अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिरिक्‍त कामाचा ताण येतो, पण यावर पर्याय म्हणून आम्ही पोलीस पाटील, पोलीस मित्र व ग्राम रक्षक दलाचा वापर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र मनुष्य बळाची संख्या पूर्ण झाल्यावर आणखी उत्तम काम करणे शक्‍य होईल.
– नीलकंठ जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस ठाणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)