कामशेतमध्ये 17 अटक, तर 119 जण तडीपार

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत शहरामध्ये गणेशोत्सव आणि बकरी ईद व अन्य सणांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील व ग्रामीण भागातील परस्पर विरोधी गटांवर तडीपारीची कारवाही करण्यात आली. त्यातच वाळुंज गटविरुद्ध प्रक्षोभक ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल कामशेत गावठाणातील भैरवनाथ मित्र मंडळातील 17 युवकांवर माहिती तंत्रज्ञान कायदा सन 2000 च्या कलम 66 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यातील 3 मुले ही अल्पवयीन आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे व कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कामशेत शहरामध्ये शिंदे गट आणि वाळुंज गट या दोन गटामध्ये राजकीय वैमन्यस्यातून सुमारे 2004 पासून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाळुंज गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये 2007 या साली अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच कामशेत बाजारपेठेमध्ये शिंदे गटातील भरत शिंदे यांची हत्या करण्यात आली होती. ऑगस्ट 2015 मध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी दिवसाढवळ्या आचारसंहिता लागू असताना वाळुंज गटातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मावळ तालुकाचे अध्यक्ष मंगेश उर्फ बंटी वाळुंज याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

त्यातच कामशेत गावठाणातील भैरवनाथ मित्र मंडळातील मुलांनी सोमवार (दि. 27) रोजी सायंकाळी वाळुंज गटाविरुद्ध प्रक्षोभक ध्वनिफीत सर्वत्र पसरवली व गंभीर गुन्ह्याचा कट रचून कट रचल्याने तसेच गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याने यावर कायदा सुवेवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन शहरातील शांतता भंग होऊ नये. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील दोन्ही गटातील व ग्रामीण भागातील नाणेकर गट, आंद्रे गट व इतर काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून 119 जणांना तडीपार करण्यात आले आहे.

यावेळी पोलीस प्रशासनातील उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. शिवथरे व कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सहाय्यक फौजदार दत्तात्रय खंडागळे, पोलीस हवालदार गायकवाड, डावकर, संतोष घोलप, सकपाळ भोईर शिंदे, खेंगरे कामठे यांच्या टीमने धडक कारवाही करून रात्री 17 जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली असता पुढील काही दिवसांमध्ये गंभीर गुन्हा करणार असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये सुशांत संजय मलेकर, अक्षय अनिल शिंदे, प्रणित बाळू शिंदे, अतुल बाळासाहेब मेदगे, वैभव बाळू शिंदे, प्रतीक राजेश दाभाडे, हृषीकेश सुरेश शिंदे, प्रतीक रामदास टकले, गणेश दीपक शिंदे, रितेश हिरामण दौंडे, निखिल भरत शिनगारे, विशाल अनिल शिंदे, संकेत बापू ढवळे, अभिजित अमृत शिनगारे, महादेव सुनील रणदिवे, आशिष मदन दाभाडे (सर्व रा. कामशेत, मावळ) या तरुणांना पोलिसांनी अटक केली.

कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)