कामनंतर ई-निविदा प्रक्रियेचा “फंडा’

बारामती नगरपरिषदेचा अजब आणि गैरकारभार चव्हाट्यावर : आता नेमका कामाचा ठेका द्यायचा कोणाला?
बारामती – बारामती नगरपालिकेच्या कामकाजात मात्र एकहाती सत्ता असताना देखील सुधारणा होतच नाही. आधी कामाला सुरुवात, नंतर निविदा “प्रक्रिया’ पूर्ण करण्याच्या फंदात प्रशासन व पदाधिकारी चांगलेच अडकले आहेत.

नेत्यांच्या सुचनांचे पालन करण्याच्या नादात टेंडर निविदाप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच बारामती शहरातील पाटस नाक्‍यापर्यंतच्या परिसरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी सुशोभिकरणासाठी सिमेंटच्या मृर्त्यांचे काम अगोदरच देण्यात आले. आता प्रत्यक्ष ई-निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर ज्या ठेकेदाराला कामकरण्यास सांगितले होते, त्याच्यापेक्षा कमी दराची निविदा प्राप्त झाली आहे. आता नेमका कामाचा ठेका द्यायचा कोणाला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, या मृर्त्यांसाठी सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात आला. त्याच्या निविदा उघडण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्ष कामाचा ठेका अगोदरच देण्यात आला. आतापर्यंत बहुतांश मृर्त्यां देखील तयार झाल्या आहेत. आता कारागीर शेवटचाहात फिरवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कारागीराला प्रति मृर्ती 40हजार रुपये मोजण्यात येणार आहेत. या सुशोभिकरणाच्या कामासाठी सल्लागार अभित्यांनी दिलेल्या अहवालानुसार 9 लाख 31 हजार 99 रुपये इतका आहे. तरवारकरी मुद्रेतील मृर्त्या आणि म्युरल्ससाठी सल्लागार अभियंत्यांनी 9 लाख 33 हजार 500 रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. त्यानुसार ई-निविदा पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या. ही प्रक्रिया सुरू असतानाच प्रत्यक्ष मृर्त्या बनविण्याच्या कामाचा ठेका देखील देण्यात आला. मृर्त्या आकाराला आल्या आहेत, असे असताना ई-टेंडर पद्धतीने मागविलेल्या निविदा उघडण्यात आल्या. त्यामध्ये 4 निविदा प्राप्त झाल्या आहेत.

पुढच्या महिन्यात पालखीचे आगमनबारामतीत होणार आहे. आता ज्या ठेकेदाराने कमी दराने निविदा भरल्या.त्यालाच काम देणे नियमानुसार गरजेचे आहे. मात्र, तुलनेने जवळपास कमीदराने निविदा कृष्णा असोसिएट्‌सने भरल्याने आता तडजोड कशी करायची, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. या प्रकरणी विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते, नगरसेवक विष्णूपंत चौधर यांनी कागदोपत्री माहिती प्रशासनाकडून घेतली. तेव्हा ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होण्या आधीच मृर्त्यांचे काम सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले. आता या सर्व प्रकारात प्रशाकीय अडचणी वाढल्या आहेत. सल्लागार अभियंत्यांनी दिलेल्या अंदाजे खर्चाच्या तरतुदी नुसार जवळपास 18 लाख 64हजार 599 रुपये खर्च दोन्ही कामाला येणार होता. वजा 21 टक्के कमी दराच्या निविदामुळे दोन्ही कामे 15 लाख 19 हजार 588 रुपयांत होणार आहेत. नगरपालिकेचे 3 लाख 45 हजार 11 रुपयांची बचत होणार आहे. भ्रष्टाचारमुक्त व ई-निविदा पद्धतीने काम करून घेण्याचा शासनाचा निर्देश आहे. तरी देखील यापद्धतीने काम केले जात असल्याने नगरपालिकेच्या निधीचा देखील गैर वापर होत आहे. यापूर्वी दोन वेळा पालिकेच्या कारभाराची चौकशी झाली. रितसरप्रक्रिया राबवून काम केले तर पूर्ण बहुमत असलेल्या बारामती नगरपालिकेत कोणताही अडथळा येणार नाही. परंतु, नियम डावलून काम होत असल्याने पुन्हा एकदा बारामती नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रशासकीय जबाबदारी असलेले मुख्याधिकारी निलेश देशमुख रजेवर आहेत. या प्रकारच्याकामाच्या पद्धतीला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा देखील विरोध आहे; परंतु त्यांना उघड प्रतिक्रिया देता येत नाही.

दबाव आणण्याचा प्रकार होण्याची शक्‍यता

कामामध्ये स्पर्धा व्हावी, चांगले ठेकेदार यावेत. स्पर्धेमुळे खर्च देखील वाचतो, असे असताना अगोदर कामनंतर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता कमी दराने निविदा आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणाले आहेत.त्यामुळे कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला दबाव आणण्याचा देखीर प्रकार होऊ शकतो, असे विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते, विष्णूपंत चौधर यांनी सांगितले.

अशा आल्या आहेत निवेदा

पुनित कन्स्ट्रक्‍शन यांनी 4.50 टक्के कमी दराने, एम. एस. पद्मावती कन्स्ट्रक्‍शनने 1.10 टक्के कमी दराने, एम. एम. कन्स्ट्रक्‍शनने 0.90 टक्के कमी दराने आणि कृष्णा असोसिएट्‌स यांनी वजा 21 टक्के कमी दराने निविदा भरली आहे. तर मृर्त्यां बसविण्याच्या परिसरातील रस्त्याचे सुशोभिकरण करण्याच्या कामात देखील पुनित कन्स्ट्रक्‍शन 5 टक्के कमी, एम. एस. पद्मावती कन्स्ट्रक्‍शन 1 टक्का कमी, एम. एम. कन्स्ट्रक्‍शन वजा 0.90 टक्के, श्रीकांत बर्गे वजा 10 टक्के कमी,आणि कृष्णा असोसिएट्‌सने वजा 16 टक्के कमी दराने निविदा भरल्या. त्यामुळे दोन्ही कामाचा ठेका मिळण्यास अनुक्रमे वजा 16 आणि वजा 21 टक्के कमी दराने निविदा भरलेल्या कृष्णा असोसिएट्‌सला काम देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या कमी दराच्या निविदामुळे अगोदरच काम करण्याच्या सूचना दिल्यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)