कामचुकार अधिकाऱ्यांना घरी बसवा!

पक्षनेत्यांनी सुनावले : शहराला साथीच्या आरोग्याचा विळखा

पिंपरी – महापालिका आरोग्य, वैद्यकीय विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होवू लागला आहे. प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे कचऱ्यांच्या प्रश्‍नासह स्वाईन फ्लू, डेंग्यूसह अन्य साथीचे आजार वाढू लागले आहेत. संबंधित विभागप्रमुखांनी जबाबदारी पुर्वक कामे न केल्यास त्यांना घरी बसवा, अशा शब्दात सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना सुनावले.

महापालिकेचे आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण व वैद्यकीय विभाग नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे विभाग आहेत. शहरातील रस्ते, गटर्स साफसफाई करुन घरोघरचा कचरा उचलणे, हे आरोग्य विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु, शहरातील ठिकठिकाणचा कचरा वेळेवर उचलला जात नाही, साफसफाईची कामे वेळेवर होत नाहीत. कचरा वेचकांचा पगार वेळेवर होत नाही. तर वायसीएम रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढला आहे. अन्य रुग्णालयात सोयी-सुविधाचा अभाव आहे. त्या रुग्णालयात योग्य सुविधा दिल्यास वायसीएमचा ताण कमी होणार आहे.

त्याचबरोबर संसर्गजन्य साथीचे आजार बळावत चालले आहेत. “स्वाईन फ्लू’ने 37 रुग्णाचा मृत्यू तर 300 हून अधिक नागरिक बाधित आहेत. डेंग्यू रुग्णाची संख्याही वाढू लागली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी खबरदारी घेत नाहीत. त्यांनी राबविलेल्या उपाययोजना कमी पडू लागल्या आहेत. त्याचबरोबर भाजपने पारदर्शक कारभाराची हमी जनतेला दिली आहे. परंतु, वैद्यकीय विभागाने वायसीएम रुग्णालयात साफसफाईच्या कामासाठी राबविलेल्या टेंडर प्रक्रियेत निविदा पुर्व सभा (प्रीब्रिड) घेतली नाही. ते टेंडर राबविल्यानंतर ठेकेदारांची निविदा पुर्व सभा का घेतली नाही. याबाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडून चौकशी करण्यात येईल. संबंधित विभाग प्रमुखांना याविषयी जाब विचारण्यात येईलही असेही पक्षनेते एकनाथ पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)