कामगार कल्याणास प्राधान्य हे मालपाणी उद्योग समूहाचे वैशिष्टय -आमदार थोरात

          विक्रमी अर्धशतकी सेवापूर्तीनिमित्त कॉ.माधव नेहे यांचा गौरव सोहळा

कामगारांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना सातत्याने राबविणाऱ्या मालपाणी उद्योग समुहाने कामगार कल्याणास प्राधान्य हे वैशिष्टय नेहमी जपल्याने येथे कामगार आणि व्यवस्थापन हातात हात घालून गुण्यागोविंदाने काम करताना दिसतात. मालपाणी समुहाने रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्याने हजारो परिवार तरले आहेत असे उद्गार राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज काढले.

येथील कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. माधव नेहे  50 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य तंबाखू कामगार महासंघ व मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यगौरव सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून आमदार थोरात बोलत होते. मालपाणी इंडस्ट्रीयल पार्कमध्ये संपन्न झालेल्या या सोहळयाप्रसंगी व्यासपीठावर थोरात यांचेसह नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी, अलका नेहे, संघटनेचे सरचिटणीस ऍड.ज्ञानदेव सहाणे, सचिन पलोड आदी उपस्थित होते.

माधव नेहे हा माणूस एक यशस्वी कामगार नेता आहे. कारण त्यांनी कधीच आततायी भूमिका घेतली नाही, आक्रस्ताळेपणा केला नाही. उद्योग जगला तर कामगाराचा रोजगार जिवंत राहील याचे त्यांनी नेहमी भान ठेवले. तिन हजार पेक्षाही अधिक परिवारांना मालपाणी उद्योग समूहामुळे रोजगार मिळतो. कामगारांना आपल्या परिवारातील घटक मानणारी भक्कम वैचारिक बैठक या समूहाला असल्याने कामगार आणि मालक यांच्यात छान सुसंवाद येथे पहावयास मिळतो असे थोरात यावेळी म्हणाले.

नगराध्यक्षा तांबे यांनी आपल्या भाषणात कॉ.नेहे यांच्या समर्थ नेतृत्वाच्या यशाचे गमक परिपक्वता, सकारत्मकता आणि  समंजसपणात असल्याचे सांगितले. राजेश मालपाणी यांनी आपल्या भाषणात नेहे यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरवाने उल्लेख केला. नेहे यांनी बजावलेली अर्धशतकी सेवा हा मालपाणी समुहातील विक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. कॉ.सहाणे मास्तर आणि कॉ.नेहे या दोघांच्याही विचारी नेतृत्वामुळे गेल्या तीस वर्षात समूहात संप अथवा बंद झाला नाही. परस्पर सुसंवाद चांगला राहिल्याने कामगारांसाठी अनेक योजना राबविता आल्या. कामगार आणि त्यांचा परिवार आणि पाल्यांसाठी आरोग्य, शिक्षण, निवास, क्रीडा अशा अनेक सुविधा समाधानकारक रीतीने उपलब्ध करून देता आल्या. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने धर्नुधर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले तसेच माधव नेहे यांनी कामगार युनियनचा रथ कुशलतेचे चालविला असेही मालपाणी म्हणाले.

सत्कारास उत्तर देताना नेहे यांनी पाच दशकांच्या कारकीर्दीत आपल्यावर विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या टाकणारे दिवंगत कामगार नेते कॉ. सहाणे मास्तर,उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी, संचालक राजेश मालपाणी व सर्व कामगार बंधू भगिनी, पत्नी अलका या सर्वांनी केलेल्या सहकार्याचा कृतज्ञतेने उल्लेख केला. अनेक आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.

कॉ.नेहे यांना आमदार थोरात यांच्या हस्ते मानपत्र, शाल,श्रीफळ, पुष्पगुच् छ आणि भेटवस्तू देऊन उद्योग समूह व कामगारांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनीही नेहे दाम्पत्याचा भावपूर्ण सत्कार केला. संगमनेर विधानसभा मतदार संघाच्या वतीने तसेच संगमनेर शहराच्या वतीने आमदार थोरात व नगराध्यक्षा तांबे यांनी नेहे दाम्पत्याचा विशेष सन्मान केला. नेहे यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव तळचे सरपंच राधाकिसन नेहे यांचेही यावेळी भाषण झाले.

कॉ.नेहे यांच्या मानपत्राचे वाचन मुरारी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शुक्ला आणि व्यवस्थापक रमेश घोलप यांनी केले. श्रीराम नवमीचे औचित्य साधून कार्यक्रमस्थळी श्रीरामपंचायन मूर्तींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मालपाणी इंडस्ट्रीयल पार्कच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मालपाणी उद्योग समूहातील कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यासह तालुक्याच्या विविध भागातून आलेले राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)