कामगार उपायुक्‍तालयास महापरिनिर्वाण दिनाचा विसर

पिंपरी – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात सर्व शासकीय कार्यालयात त्यांच्या विचारांचा जागर करण्यात येत असताना पुणे कामगार उपआयुक्त कार्यालयाला त्यांचा विसर पडला. अखेर कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने कार्यालय बंद होण्याच्या वेळेस सायंकाळी पाच वाजता डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

देशभरात सगळीकडे महामानवाला अभिवादन करण्यात येत असताना पुणे अतिरिक्त कामगार आयुक्तांनी मुंबईहून कामगार आयुक्त राजीव जाधव येतील तेव्हाच पुष्पहार घालून पूजन करण्यात येईल अशी भुमिका घेतली. भिंतीवर असलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला स्वच्छ करून पुजनासाठी टेबलावर ठेऊन पुष्पहारही घालण्याचे कामगार अतिरिक्त आयुक्त शैलेश पोळ यांनी जाणीवपुर्वक टाळले.

-Ads-

बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी याविषयी आक्रमक भुमिका घेत पोळ यांना चांगलाच जाब विचारला. परंतु, पोळ यांनी आम्हाला सर्व कळतं आम्हाला आमचं काम शिकवू नका, आयुक्त साहेब आल्यावरच पूजा करु, असे सांगितले. त्यामुळे काही काळ शाब्दिक चकमकीही उडाल्या. कामगार संघटनेचे इतर प्रतिनिधीही उपस्थित झाले, सर्वांनी प्रशासनाचा जाहीर निषेध करत वरिष्ठांकडे याची तक्रार करण्याची कुणकुण लागल्यावर व इतर कामगार अधिकाऱ्यांना चूक लक्षात आल्यावर सायंकाळी 5 वाजता प्रतिमा भिंतीवरून खाली उतरून पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर या वादावर पडदा पडला. यावेळी मनसे कामगार आघाडीचे मिलिंद सोनवणे, सिटूच्या कामगार प्रतिनिधी भारती अवसरे आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)