कामगार आयुक्‍त कार्यालयासमोर कामगारांचे निदर्शने

वेतनवाढीचा प्रश्‍न न सुटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 19 ऑगस्टपासून उपोषण

नगर – अत्यल्प पगारात कामगारांच्या चालू असलेल्या शोषणाच्या निषेधार्थ पगारवाढीच्या प्रमुख मागणीसाठी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगार युनियनच्या वतीने सहा. कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामगारांना प्रसादरूपी मानधन नको तर श्रमाचा योग्य मोबदला मिळण्याची मागणी करण्यात आली. यावेळी लाल बावटा संघटनेचे जिल्हा सचिव ऍड. सुधीर टोकेकर, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सतीश पवार, किशोर कांबळे, प्रभावती पाचारणे, प्रवीण भिंगारदिवे, अनिल फसले, सुनील दळवी, सुभाष शिंदे, राजेंद्र कल्हापुरे, राधाकिसन कांबळे, सुनीता जावळे, आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगार युनियनच्या वतीने सहा. कामगार आयुक्‍तांपुढे पगारवाढ व इतर कामगारांच्या मागण्यांसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला असून, आज रोजी अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्‍वस्त व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची पगारवाढीसाठी बैठक झाली. या बैठकीत ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी 2500 ते 2800 रुपयांनी कामगारांचे पगार वाढविण्याची तयारी दर्शवली. मात्र, सर्व कामगार 6 हजार रुपयेपर्यंत पगारवाढीवर ठाम राहिल्याने आजची दुसरी बैठकसुध्दा निष्फळ ठरली. या बैठकीसाठी अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्‍वस्त मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले, हैदर मॅडम, फल्लूशेठ, मुख्य विधी सल्लागार ऍड. विसपुते उपस्थित होते. सदर प्रश्‍नावर पुन्हा शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट रोजी बैठक बोलविण्यात आली असून, या तिसऱ्या बैठकीत कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास कामगार युनियनच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टमध्ये 225च्या पुढे कामगार असून, ते सिक्‍युरिटी, हेल्पर, मेंटनेस, आदी विविध विभागात कार्यरत आहेत. कामगारांना चार ते पाच हजार रुपयांवर महिनाभर राबविले जात आहे. या वेतनात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्‍य असून, पगारवाढीसाठी सर्व कामगार एकवटले आहेत. कामगारांना अत्यंत तटपुंजा पगार प्रसाद स्वरूपात दिला जातो. प्रसाद नको तर श्रमाच्या योग्य मोबदल्याची मागणी कामगार करत आहेत.

संघटनेच्या वतीने चार महिन्यांपूर्वी मेहेरबाबा ट्रस्टच्या दप्तर तपासणीचा अर्ज दिला होता. जेव्हा कामगार व ट्रस्ट यांच्यातील वाद वाढला तेव्हा आठ दिवसांपूर्वी सहा. कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून ट्रस्टची तपासणी करण्यात आली. यामुळे कामगारांना येथून न्याय मिळण्यास शंका निर्माण झाली असून, कोणाच्याही दबावाला बळी न पडता सर्व कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी लोकशाही पध्दतीने उपोषण करणार आहेत. कामगारांची मुस्कटदाबी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांनादेखील प्रतिउत्तर देण्यासाठी कामगार सज्ज असल्याची भावना युनियनचे अध्यक्ष सतीश पवार व ऍड. टोकेकर यांनी व्यक्‍त केली. पगारवाढीसह कामगारांचे किमान वेतन, पगारी रजा, कामगारांचे तडकाफडकी करण्यात येणारे निलंबन व अन्यायकारक मिळणारी वागणूक थांबावी, आदी मागण्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)