कामगारांचा तारणहार नेता हरपला; मान्यवरांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

पुणे – मुंबईची गती चाकावर असते, ही चाके श्रमिक चालवितात. ही चाके थांबविण्याची ताकद जॉर्ज फर्नांडिस सारख्या नेत्यामध्ये होती. त्याचबरोबर लढवय्या नेता आणि कामगारांचा तारणहार असा नेता हरपला आहे, अशा शब्दात मान्यवरांनी ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली.

जॉर्ज फर्नांडिस म्हणजे मुंबईचा बंद सम्राट असेच त्यांना म्हणावे लागेल, श्रमिकांवर जग चालते हे उमगलेला नेता होता. त्यांनी सुरवातीला हॉटेल कामगारांची युनियन बांधली. मठात राहिल्यामुळे त्यांच्या अंगी शिस्त, साधेपणा आणि भाषेवर प्रभुत्व होते. नेहमी नागरिकांमध्ये त्यांचा संचार असल्यामुळे कुटुंबासाठी खूप कमी वेळ द्यायचे. दिवसभराच्या कामानंतर रात्री बारा ते पाच या वेळेत हॉटेल कामगारांना ते भेटत होते. मुंबईची गती चाकावर असून, हे चाक श्रमिक चालवतात. त्यामुळे जिथे चाक आहे तिथे माझे मन झेपावते, असे ते नेहमी म्हणत. प्रत्येक संपाचे नियोजन काटेकोर असायचे, संप फुटणार नाही याची ते खबरदारी घेत त्यामुळे अन्य संघटनाही त्यांना साथ द्यायचे. त्यांनी तरूण आणि श्रमिक यांची युती करून सखा पाटील यांचा पराभाव केला. साध्या राहणीतच बुध्दी शुध्द राहते असे त्यांचे मत आहे. केंद्रीयमंत्री असताना त्यांनी सुरक्षा नाकारत सामान्य माणूस मला भेटला पाहिजे असे ते म्हणायचे. तेव्हापासून ते केंद्रीय नेते बनले.

– डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते


मुंबई हादरविणारे असे कामगार क्षेत्रातील एक उत्तुंग नेते होते. लढवय्या कामगार नेता म्हणून त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली होती. मुंबई बंद पाडण्याची ताकद असणारा नेता होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा आमच्या सारख्या कामगार नेत्यांना ते कामगार नेते म्हणूनच जास्त भावतात. कामगारांच्या प्रश्‍नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला कसे वाकवायचे याची कसब असल्यामुळेच त्यांची आंदोलने यशस्वी व्हायची.

– मुक्ता मनोहर, कामगार नेत्या, महापालिका


कामगारांना भावनापूर्ण आवाहन करून त्यांचे व्यापक लढे उभे करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या परस्पर विरोधी राजकीय भूमिकांमुळे तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये घेतलेल्या विसंगत दृष्टीकोनामुळे डाव्या चळवळीशी त्यांची नाळ कायमाची जुळू शकली नाही त्याचा खेद वाटतो.

– अजित अभ्यंकर, शहराध्यक्ष, सिटू

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)