कामगारनगरी होतेय “एज्युकेशन हब’

– चिखलीत शासकीय अभियांत्रिकीचा विस्तार
– प्राधिकरणाशी नाममात्र एक रुपया दराने 30 वर्षांचा भाडे करार

पिंपरी – शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्याचे जुळे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शैक्षणिक विस्तार होत आहे. त्याकरिता प्राधिकरणातील चिखलीतील 40 एकर गायरान जागा महसूल विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार, लवकरच अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचे काम सुरु होणार आहे. मागील काही वर्षात नामांकित शिक्षण संस्थांना शहरात प्रवेश झाला असताना आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यात भर पडणार असून कामगारनगरी “एज्युकेशन हब’ म्हणून नावारुपास येत आहे.

चिखली गावचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश झाला. मात्र तत्पुर्वीच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे (पीसीएनटीडीए) गट नं 539 मधील एकूण 85 एकर गायरान जागेचा ताबा देण्यात आला होता. या भूखंडाच्या देखभालीचे काम मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपविण्यात आले होते. यापैकी 30 एकर जागा एमएनजीएल पंप, मंदिर, तलाठी कार्यालय, शाळा अशा विविध सार्वजनिक हितासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यापैकी 40 एकर जागा शासकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्ताराकरिता हा भूखंड उपलब्ध करुन देण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महसूल विभागाकडे केली होती. ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित होती.

दरम्यान, ही गायरान जागा चिखली गावच्या मालकीची असल्याने या भूखंडापैकी 15 एकर जागा सार्वजनिक सोयी-सुविधांकरिता उपलब्ध करुन देण्याची ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. याकरिता विभागीाय आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. आता चिखली गावच्या गट नं. 569 मधील 11 हेक्‍टर 30 गुंठे जागा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्तारीकरणाला 30 वर्षांच्या भाडपट्टयाने नाममात्र एक रुपया दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

नामांकीत संस्थांना शहराची भुरळ
पायाभूत सोयी सुविधांचा विकास, झपाट्याने वाढत असलेले नागरीकरण यामुळे पिंपरी-चिंचवड कामगारनगरी शैक्षणिक संस्थांना खुणावू लागले आहे. चिखलीतील गट नं. 569 मधील पेठ क्रमांक 14 मध्ये एकूण 80 एकर गायरान जागेपैकी 11 हेक्‍टर 30 गुंठे जागा एमएनजीएल पंपाशेजारी आहे. याठिकाणाहून काही अंतरावरच पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरु झाले आहे. आता एमएनजीएल पंपानजीकच्या मोकळ्या भूखंडावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तार केला जाणार आहे. मागील काही वर्षात नामांकित शैक्षणिक संस्थांचा शहरात प्रवेश झाला असताना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडचे महत्त्व वाढणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)