कामकाज थंड, दौरे उदंड!

पिंपरी-चिंचवड वर्तमान
निशा पिसे
—-

वेगळ्या कारभाराची अपेक्षा असलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चुकीच्या कारभाराचे सर्व “विक्रम’ मोडीत काढले आहेत. मागील दीड वर्षाच्या कालावधीत तब्बल 16 दौरे सत्ताधाऱ्यांनी काढले आहेत. त्यात सात विदेश दौऱ्यांचा समावेश आहे. शहरावर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. त्यातच अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प रेंगाळल्याने शहर विकासाची गती मंदावली आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीत सर्व राजकीय पक्ष मश्‍गुल झाल्याने सामान्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांचा दौऱ्यांचा सोस आणि विरोधकही त्यात सामील झाल्याने बापड्‌या करदात्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेत प्रथमच सत्तेवर आल्यामुळे सुरुवातीचा सहा महिन्यांचा भाजपचा चाचपडत सुरू असलेला कारभार शहरवासियांनी मुकाटपणे सहन केला. मात्र, आता दीड वर्षे उलटून गेले तरी सत्ताधाऱ्यांना कारभाराचा सूर गवसलेला नाही. पक्षांतर्गत वर्चस्ववादातून सुरु असलेले “आडवा व जिरवा’चे धोरण आणि त्यातच “शो-बाजी’मध्ये अडकलेले भाजपचे पदाधिकारी यामुळे “श्रीमंत’ महापालिकेच्या कारभाराला “अवकळा’ आली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने कचरा संकलन, पंतप्रधान आवास योजनेसारख्या कोट्यावधीच्या निविदा मंजुरीचे निर्णय भाजपला मागे घ्यावे लागले. “फुटकळ’ कामांसाठी सल्लागार नेमण्याचा पायंडा भाजपने पाडला. अनधिकृत बांधकाम नियमितीकरण, शास्ती कर माफीचा फुसका बार ठरला. ठराविक विधानसभा मतदार संघापुरते बांधकाम परवाना बंदीचा निर्णय घेतल्याने भाजपच्या कारभाऱ्यांवर संशयाचे धुके दाटले.

महापालिकेची सुत्रे हातात घेताना प्रशासनाला सुतासारखे सरळ करू असे सांगणारे सत्ताधारी आता प्रशासनाच्याच खांद्यावरुन गोळ्या झाडत आहेत. त्यातून महापालिका आयुक्‍तांवर सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाल्याचेही आरोप झाले. सत्ताधाऱ्यांच्या बचावासाठी आयुक्‍त धावून येत असल्याने सत्ताधारी व प्रशासनाची मिलीभगत शहरवासियांनी कधीच ओळखली आहे. अशा परिस्थितीत करदाते विरोधकांकडे मोठ्या आशेने शहरवासीय पाहत होते. लोकप्रतिनिधी व प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत, असे म्हटले जाते. हा रथ सुरळीतपणे हाकण्याचे दायित्व विरोधकांवर असते. मात्र, सध्या सुरु असलेल्या बर्सिलोना दौऱ्यात आयुक्‍तांनी काढलेल्या “सेल्फी’मुळे सत्ताधारी, विरोधक व प्रशासनाची मिलीभगत शहरवासियांसमोर आली. महापौरांच्या आधीच विरोधक बर्सिलोना दौऱ्याला पोहचले. भाजपच्या दीड वर्षाच्या कालावधीत विदेशात सात तर देशांतर्गत नऊ दौरे निघाले. एकीकडे जीएसटी, एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाला “ओहोटी’ लागली असताना दुसरीकडे दौऱ्यांवर कोट्यावधींची उधळपट्टी सुरू आहे. बहुचर्चित मेट्रोसारखा प्रकल्प निधी अभावी निगडीऐवजी पिंपरीपर्यंत करावा लागत आहे. त्यातच आता सत्ताधारी, प्रशासन व विरोधकांची “नाळ’ जुळल्याने शहरवासियांना वाली कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)