काबुलमध्ये एकाच दिवशी दोन रॉकेट हल्ले

दहशतवाद्यांबरोबर जोरदार धुमश्‍चक्री सुरू
काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील उच्चस्तरिय अधिकाऱ्यांच्या वसाहतीमध्ये सकाळी दोन रॉकेट डागण्यात आली. या परिसरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरू असल्याचे सांगितले गेले आहे. अध्यक्ष अशर्रफ घनी यांनी तालिबानसमोर तीन महिन्यांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेला हा हल्ला नक्की कोणी केला याबाबत निश्‍चित माहिती ताबडतोब मिळू शकलेली नाही.

काबुल जवळील रेका खाना जिल्ह्यातील इदगाह मशिदीच्या परिसरामध्ये सैनिकी हेलिकॉप्टरमधून सुरक्षा रक्षकांनी जोरदार गोळीबार करायला सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांनी रेका खानामधील एका इमारतीचा ताबा घेतला आणि तेथूनच काही रॉकेट काबुलच्या दिशेने सोडली असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या रॉकेट हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.

सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याचेही या प्रवक्‍त्याने सांगितले. अध्यक्ष घनी यांनी ठेवलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाचे संयुक्‍त राष्ट्र आणि नाटोकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र तालिबानकडून अद्याप या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिला गेलेला नाही. गेल्या दोन आठवड्यात तालिबानने केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये शेकडो जण मरण पावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)