कापुरहोळ येथे धोकादायक डिपी

वीज वितरणचा कारभार; अपघाताच धोका

कापुरहोळ- कापुरहोळ (ता. भोर) येथील पुणे-सातारा महामार्गालगत वर्दळीच्या ठिकाणी गट नं. 397 मधील वीज वितरण कंपनीचे उच्चदाब रोहित्र (डीपी) महामार्गालगत भरवस्तीत घरांलगतच आहे. या डीपीलगत शाळा, रस्ता, दुकाने, वाहनांची वर्दळ असल्याने मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. डिपी जोडताना उच्चदाबाच्या केबल उघड्या आहेत. संबंधीत ठेकेदाराने काम योग्य केलेले नसताना सदर वीजवितरणच्या अधिकारी वर्गाने डीपीचा वीज प्रवाह कसा सुरू केला. याबाबत नागरीकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. सदर डिपी एखादा अपघात होण्यापुर्वी तातडीने स्थलांतरीत करावी, अशी मागणी डोंगरी विकास परिषदेचे सदस्य विश्‍वास ननावरे यांनी केली आहे.

कापुरहोळ येथील गट नं. 397 मध्ये डीपी बसवताना जमीन मालकांची परवानगी न घेताच डीपी घाईघाईने बसविला. मात्र, सदर डीपी भरवस्तीत घरांच्या लगत असून शाळेत जाणाविद्यार्थी या डीपीजवळून जातात. डीपीच्या केबलही उघड्यावर असून त्या भोवताली पालापाचोळा, कचरा पडलेला आहे. यामुळे भविष्यात कोणताही अनुचीतप्रकार होण्याची शक्‍यता आहे. याबाबत विज वितरण कंपनीला वारंवार लेखी व तोंडी निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. याउलट संबंधीत जमीन मालकाला स्वत:च्या खर्चाने डीपी काढावा म्हणून वीज कंपनीने नोटीस दिली आहे. यामुळे नागरीक संतप्त झाले असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना अतिक्रमणात सदर डीपी काढण्याचे आश्‍वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले होते. परंतु, त्यांनी अद्यापही डीपी काढलेला नाही. याबाबत नागरीकांनी तीव्र भावना व्यक्‍त केल्या आहेत. या डीपीच्या तारेला तार घासून ठिणगी पडल्यास नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. वीज वितरण कंपनी नागरीकांच्या जिवाशी खेळत आहे. तरी सदर डीपी त्वरीत काढावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)