कात्रज तलावाच्या दुर्लक्षाचे ‘प्रदूषण’

सर्वपक्षीय सभासदांची सडकून टीका

पुणे – “शहरातील तलाव, नद्यांवर जलपर्णी वाढत असून, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. जलपर्णी काढण्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, यामुळे डास प्रतिबंधक कॉईलचा खप मात्र प्रचंड वाढल्याची खिल्ली सभासदांनी उडवली. हा खप वाढविण्यासाठीच महापालिका प्रशासन कार्यरत आहे का,’ असा सवाल करत सर्वपक्षीय सभासदांनी मंगळवारी मुख्य सभेत प्रशासनाला फैलावर घेतले.

-Ads-

सभेच्या प्रारंभीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी अंगावर प्रतिकात्मक जलपर्णी गुंडाळून आंदोलन करत सभागृहाचे लक्ष वेधले. “कात्रज परिसरातील नानासाहेब पेशवे तलावात जलपर्णी वाढत आहे, तर कात्रज प्राणी संग्रहालयातील तलावात संतोषवाडी, मांगडेवाडी, गुजरवाडी, भिलारेवाडीतील सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे तलावाचा श्वास कोंडला जात असून नागरिक आणि प्राण्यांना त्रास होत आहे,’ अशी नाराजी व्यक्त केली.

महापौर आणि आयुक्तांनी या तलावाची पाहणी करण्याची मागणी केली. त्यावर यासंदर्भात “शहर सुधारणा समितीने वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही,’ अशी तक्रार सदस्य राणी भोसले यांनी केली. “जलपर्णी तलावात आणून टाकली जात असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे डास प्रतिबंधक औषधांचा खपही वाढला,’ असा दावा प्रकाश कदम यांनी केला. “जलपर्णी कोणता विभाग काढतो, हेच समजत नाही, तसेच सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी केलेल्या वर्गीकरणाचे काय झाले,’ असा सवाल दत्तात्रय धनकवडे यांनी केला.

वर्गीकरणाचे दहा कोटी मिळालेच नाहीत
गुजरवाडीसह परिसरातील सांडपाणी कात्रज तलावात मिसळत असल्याने स्वतंत्र सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी गेल्या वर्षी दहा कोटी रुपयांचे वर्गीकरण केले होते. मात्र, या कामासाठी अजून पैसेच मिळालेले नाहीत, असा खुलासा पालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन विभागाने केला. आगामी अंदाजपत्रकात या कामासाठी तरतूद केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले, तर जलपर्णी वाढल्याची कबुली देत निधी अभावी उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मनुष्यबळ अपुरे असल्याचे उद्यान विभागाने सांगितले. त्यावर कात्रज परिसरातील दोन्ही तलावांची पाहणी करून तोडगा काढण्याचे आदेश महापौरांनी दिले.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)