कात्रज घाटात कंटेनर ट्रेलर दरीत कोसळला !

कारचालक गंभीर जखमी : कंटेनर चालकावर गुन्हा
प्रभात वृत्तसेवा

कात्रज – मारुती ऑल्टो कारला धडक देऊन कंटेनर ट्रेलर दरीत कोसळल्याची घटना कात्रज घाटातील भिलारेवाडी येथील तीव्र वळणावर घडली. यात मारुती ऑल्टोचालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

गणेश राजन लद्दे व त्याचा मित्र प्रमोद नवनाथ देवकाते मारुती ऑल्टो क्र. एमएच 12 – एफ.यू.-1733 या वाहनातून भिलारेवाडी येथे पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. कात्रज घाटातून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर ट्रेलर गाडी क्र. एम.एच-12 एफ.झेड.5684 वरील चालक दादा शिवाजी औताडे रा.मु.पो.वांगी.ता.भूम.जि.उस्मानाबाद हा उतारावरून भरधाव येताना ताबा सुटला व मारुती ऑल्टो वाहनास चालक बाजूने जोरदार धडक दिली. यात प्रमोद देवकाते गंभीर जखमी झाला. गणेश राजन लद्दे किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक दत्तात्रय मदने व पोलीस कार्माचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.व जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

कंटेनर ट्रेलर चालक दादा शिवाजी औताडे याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने करत आहेत.

संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत

कात्रज घाट परिसरात विविध ठिकाणी तीव्र उतार असून संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच महामार्गाच्या दुतर्फा पावसाळी गटारामध्ये राडा-रोडा साठलेला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर येते. तसेच विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सदरचा रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोयास्कारपणे दुर्लक्ष होत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. या संदर्भात तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)