कात्रज-कोंढवा रस्ता निविदेचा पुन्हा वाद

“सर्व्हर डाऊन’निविदा भरण्यात अडचण

पुणे – कात्रज-कोंढवा रस्ता निविदेचा पुन्हा वाद निर्माण झाला असून, शासन नियमाप्रमाणे 80 टक्के जागा ताब्यात नसताना काढलेल्या फेरनिविदेची निविदा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी असताना नेमका मोक्‍याच्या वेळी पुणे महापालिकेचा सर्व्हर डाऊन झाला. परंतू याकडे डोळेझाक करत याच प्रकरणात पूर्वी वादग्रस्त ठरलेल्या पटेल इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीच्या हितासाठी भाजपनेच हा डाव खेळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली पटेल इंजिनिअर्स लि. या कंपनीलाच ही निविदा मिळावी यासाठी प्रशासन कार्यरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हे आरोप केले.

कात्रज ते कोंढवा या सुमारे पावणेचार कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली. या कामासाठी निविदा राबविण्याची मागील दोन वर्षांतील ही सहावी वेळ आहे. परंतू प्रत्येक वेळी ही निविदा प्रक्रिया 25 ते 30 टक्के चढ्या दराने आली आहे. तसेच पटेल इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनीलाच हे काम मिळावे या उद्देश्‍याने रिंग करून निविदा प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला गेल्याचे उघड झाले आहे. या अगोदरची निविदा मात्र अचानकपणे 25 टक्के कमी दराने आली होती. परंतू त्यामध्ये रिंग झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले होते. 24 जुलै रोजी ही फेरनिविदा काढण्यात आली. निविदा भरण्याची शुक्रवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत मुदत होती. दरम्यान सकाळी अकरा वाजल्यानंतर महापालिकेचा सर्व्हरच बंद पडला. त्यामुळे काही कंपन्यांना निविदा भरता आली नाही. तत्पूर्वी केवळ पटेल इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनीची एकमेव निविदा आली होती. निविदा प्रक्रियेत स्पर्धा होऊ नये तसेच पटेल इंजिनिअर्सलाच हे काम मिळावे यासाठी सत्ताधाऱ्यांनी टेंडर सेल, पथ विभाग आणि आयटी विभागाशी संधान साधून अडथळे निर्माण केल्याचा आरोप धनकवडे आणि तुपे यांनी केला आहे.

तसेच अजून 80 टक्के भूसंपादन झालेले नाही, असे असताना निविदा प्रक्रिया राबवली गेली, या अटीचेही उल्लंघन केल्याने सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. याला प्रोत्साहन देणात्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी धनकवडे यांनी केली आहे.

सर्व्हर 2 वाजून 20 मिनिटांनी बंद पडला. 24 जुलै ते शुक्रवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत निविदा भरण्यासाठी मोठा कालावधी दिला होता. या कामाची निविदा काढण्याची ही सहावी वेळ होती. त्यामुळे बहुतांश ठेकेदार कंपन्यांना कामाबद्दल माहिती आहे. सर्व्हर बंद पडल्याने निविदा भरता आली नाही, याबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे सायंकाळी निविदा उघडण्यात आली. यामध्ये पटेल इंजिनिअर्स लि. या कंपनीची एकमेव निविदा आली आहे. आतापर्यंत कामासाठी लागणाऱ्या 30 हेक्‍टरपैकी 12 हेक्‍टर जागेचे भूसंपादन झाले आहे. शासन नियमाप्रमाणे ते पुरेसे नसले तरी प्रशासनाचे भूसंपादनासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत.
– अनिरुद्ध पावसकर,पथ विभागप्रमुख, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)