काढू नका गर्भाशय.. ( भाग १ )

पिशवी काढल्यावर अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. गर्भाशय काढल्यावर लवकर मेनोपॉज येतो. नैसर्गिकरीत्या मेनोपॉज आल्यावर शरीर व मन त्यासाठी हळूहळू तयार होत जाते, पण शस्त्रक्रियेने काढून टाकल्यावर शरीराला पूर्वतयारीसाठी वेळच मिळत नाही. काही महिलांमध्ये शस्त्रक्रियेनंतर ओव्हरीज ठेवल्या जातात, पण अशा 20 टक्के महिलांमध्ये दोन वर्षांत तर 50 टक्के महिलांमध्ये पाच वर्षांत मासिक पाळी बंद होत असल्याचे दिसून येते, त्यामुळे अचानक घाम येणे, थंडीत गरम होणे, उन्हाळ्यात थंडी वाजणे असे घडू शकते. हाडे लवकर ठिसूळ होतात, त्यामुळे हीप फ्रॅक्‍चरच्या शक्‍यता वाढून मृत्युदर वाढतो. ब्लड प्रेशर, हृदयाची दुखणी सुरू होतात. गर्भाशय पूर्ण काढल्यावर पती-पत्नी संबंधावरही परिणाम होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे, त्यामुळेही मानसिक आरोग्य बिघडते. त्यामानाने गर्भाशयाचे मुख न काढल्यास ही समस्या कमी भेडसावते.

एखादी परिचित स्त्री किंवा रुग्ण सहजपणे सांगते, की थोडा त्रास होता म्हणून पिशवी काढली. तेव्हा त्या वाक्‍याने खरे तर मलाच त्रास होतो. किती सहज सांगतात या बायका. इतकी का ही सहज वाटण्याजोगी किंवा गंभीरपणे न घेण्याजोगी गोष्ट आहे. गर्भाशय खरेच नको होते का या स्त्रियांना, त्यांना माहीत आहे का त्याचं महत्त्व, अशा अनेक प्रश्‍नांनी एक स्त्री म्हणून, डॉक्‍टर म्हणून मी अस्वस्थ होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गर्भाशयाला होणारे विविध आजार औषधोपचार, शस्त्रक्रियेने बरे होऊ शकतात, त्यामुळे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करायला हवा. थोडा त्रास होतो म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न न करता एकदम गर्भाशय पिशवी काढणे हा तुलनेने खूपच सोपा उपाय आहे; पण जे सोपे असते ते प्रत्येक वेळी फायदेशीर असतेच असे नाही. गर्भाशय काढून होणाऱ्या त्रासातून सुटका करून घेतली असे वाटत असेल, तरी त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणामही आहेत. त्याचा आधी विचार करावा. एक लक्षात घ्या, की आपल्या शरीरातील कोणताच अवयव विनाकारण नाही. निसर्गाने दिलेल्या या देणगीचा आपण आदर राखला पाहिजे. त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. गर्भाशय हे केवळ संततीनिर्मितीसाठी असलेले साधन नाही. त्याहून ते स्त्रीसाठी अधिक काही आहे. ती स्त्रीसाठी एक संरक्षण यंत्रणाही आहे.

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करताच कामा नये, असे मी म्हणणार नाही. काही वेळा गर्भाशय काढणे टाळताच येत नाही. कधी कधी महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भाशयाची पिशवी काढणे अत्यावश्‍यक असते. जेथे अशी जिवावर बेतण्याची वेळ असते, त्या वेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पिशवी जरूर काढावी; पण अनेक वेळा इतर उपायांची माहिती करून घेतली नसल्यामुळे पिशवी काढली जाते. ते टाळले पाहिजे. अपरिहार्य असल्याखेरीज गर्भाशय काढूच नये. गर्भाशय पिशवी, नलिका, बीजकोष यांचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे. बाळंतपणात अतिरिक्त रक्तस्राव होणे, कर्करोग होणे, गर्भाशयात फॅब्रॉईडच्या गाठी होणे, ऍन्ड्रोमेट्रॉयसीस होणे, अनैसर्गिकरीत्या रक्तस्राव होणे, पिशवी नैसर्गिक जागेपासून खाली सरकणे अशा समस्या निर्माण झाल्यावर पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. जेथे जीव वाचविण्याचा प्रश्‍न असतो, तिथे पिशवी काढून टाकणे योग्य ठरते; पण, इतर विकारांमध्ये पर्यायी उपाय आहेत. याचा रुग्ण व नातेवाइकांनी विचार केला पाहिजे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)