काटकसर!

परवा दुपारी आईकडे निघाले होते, खूप उन्ह होते म्हणून जाताना आईला मस्तपैकी कोल्ड्रिंक घेऊन गेले. तर ती म्हणाली, अगं! हे एव्हढं महागाचं कशाला आणायचं! आणि कुणी सांगितले यानेच तहान भागते म्हणून? लिंबू स्वस्त होते, तेव्हाच मी त्याचे सरबत करुन ठेवले आहे. तब्येतीलाही चांगलेआणि चवीलाही! पण हे तुम्हाला कुठलं कळायला. तुम्हाला फक्‍त्त पैशाची उधळपट्टी करायची माहिती आहे. मला काही क्षण वाईट वाटलं खरं, पण आईच्या दृष्टीने विचार करु लागले. तिने काडीला काडी जमवून संसार उभा केला होता. पै पै बाजूला टाकून, काटकसर करुन आम्हा मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले होते.

खरंच, सध्या आपण सगळेच भौतिक सुखाच्या मागे धावत सुटलोय. आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न-वस्त्र-निवारा! परंतु सध्यस्थिती बघता आपल्या गरजा एवढ्याच राहिल्यात? प्रत्येक चैनीची वस्तू ही आपली गरजच बनत चालली आहे. माणसाची आर्थिक प्राप्ती कितीही असेल, पण बचतीची सवय नसेल तर भविष्यात त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. इंग्रजीत एक म्हण आहे,मनी सेव्हड मनी अर्नड .काटकसर ही फक्‍त्त पैशाचीच करायची असते का? आजकाल ऊर्जा बचत पण तितकीच महत्त्वाची आणि गरजेची आहे. पण आपण काय वागतो? छे…काय हा उकाडा म्हणून रात्रंदिवस पंखे सुरु ठेवायचे.

-Ads-

घर कसे हिलस्टेशनसारखे थंडगार असले पाहिजे म्हणून एसी चालू ठेवायचे. दिव्यांची तर सगळीकडे दिवाळीच. या सगळ्याचा वापर प्रत्येकाने विचारपूर्वक आणि काटकसरीने नको का करायला? वीज पाण्याशिवाय येते का? शहरात रस्त्याने वाहत असणारे पाण्याचे लोंढे, पाईपने सडा मारणारी आणि वाहने धुणारी माणसे बघितली की, ग्रामीण भागात पाण्यासाठी डोक्‍यावर हंडे घेऊन मैलोनमैल पायपीट करणाऱ्या माता-भगिनी डोळ्यासमोर येतात. पाण्याचा पुनर्वापर आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करुन आपण ही उधळपट्टी थांबवू शकतो.

काटकसरीवरुन मला एक गोष्ट आठवली. एकदा भगवान बुद्धांकडे त्यांचा शिष्य गेला. पोषाख फाटला होता म्हणून त्याने नव्या पोषाखाची मागणी केली. त्याप्रमाणे त्याला तो दिला गेला. काही दिवसांनी भगवान बुद्धांनी त्याला विचारले, तुला नवा पोषाख मिळाला पण जुन्या पोषाखाचे काय केले? शिष्य म्हणाला, आता मी त्याचे अंथरुण केले. मग तू तुझे जुने अंथरुण टाकून दिलेस ना? नाही, मी त्याचा खिडकीसाठी पडदा केला. जुन्या पडद्याचा गरम भांडी पकडण्यासाठी वापर करतो आणि भांडी पकडण्याचे जुने कापड मी आता जमीन पुसण्यासाठी वापरतो.

आधीचे जमीन पुसण्याचे कापड फाटून खूप खराब झाले होते, म्हणून मी त्याच्या वाती केल्या. त्यातल्याच एका वातीने आज या कक्षातील दीप उजळला आहे.आजच्या जमान्यात भगवान बुद्धांच्या शिष्या एवढा वस्तूंचा पराकोटीचा उपयोग शक्‍य नाही. परंतु संकट आल्यावरहात आखडता घेण्यापेक्षा ते येऊच नये म्हणून आत्तापासूनच दक्षता घ्यायला हवी. काटकसर, मग ती कोणत्याही प्रकारची असो, पैशाची, ऊर्जेची अगदी वेळेची सुद्धा! आपलं आयुष्य सुखी व्हावं वाटत असेल ती अनिवार्य गोष्ट आहे. आपण केलेली छोटी छोटी बचत ही केवळ आपलेच नाही तर आपल्या परिवाराचे, येणाऱ्या पिढीचे पर्यायाने आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित करते.

संपदा देशपांडे 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)