कागदपत्रे नसलेल्यांना “बीएसयूपी’ अंतर्गत घरे

आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय

पुणे – खडकवासला कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेत घरे वाहून गेलेल्या सुमारे 40 कुटुंबांकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच त्यांच्या नोंदी महापालिकेच्या गवणी विभाग तसेच पालिकेकडे असलेल्या कोणत्याही झोपडपट्ट्यांच्या रेकॉर्डमध्ये नाही. त्यामुळे त्यांना “बीएसयूपी’ अंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालवाग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आयुक्त राव यांनी शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासन, एसआए तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. दरम्यान, या घटनेत पूर्ण घरे वाहून गेलेल्यांचे सुमारे 98 पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले होते. मात्र, त्यातील 20 पंचनामे हे दुबार झाल्याने रद्द करण्यात आले असून पूर्ण घरे गेलेल्यांची संख्या 78 झाली असल्याचे या बैठकीत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

बैठकीत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण बाधितांची संख्या 806 आहे. त्यातील 78 जणांची घरे पूर्ण वाहून गेलेली असून त्यातील 35 जण “एसआरए’ योजनेसाठी पात्र झालेले आहेत. तर, 21 जणांना घरांचे वाटप करण्यात आले असून 10 जणांनी भाडेकराने घराची मागणी केली आहे. तर 6 जण अजून राहण्यासाठी जाण्यास तयार नाहीत. याशिवाय, तर उर्वरीत 40 जणांकडे कोणतेही पुरावे नाहीत, तसेच त्यांची नावे महापालिकेच्या यादीतही नाहीत. त्यामुळे त्यांना “एसआरए’ योजनेचा लाभ देता येणार नसल्याचे यावेळी जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी ज्या नागरिकांकडे झोपडपट्टी बाबत पुरावे नाहीत. त्यांना पुन्हा एकदा सात दिवसांची मुदत देऊन पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच त्यानंतरही त्यांच्याकडे पुरावे न मिळाल्यास त्यांना हडपसर आणि वारजे येथील “बीएसयूपी’ योजनेत घरे देण्यात यावीत, असे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत.

बॅंक खाती उघडण्यासाठी स्वतंत्र मोहीम
अनेक कालवाग्रस्तांकडे राष्ट्रीयकृत बॅंकेची खाती नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय मदत देण्यात अडचणी आहेत. तर मदत मिळण्यास उशीर होत असल्याने कालवाग्रस्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या सहकारी बॅंकांच्या खात्याच्या माहिती वरून त्यांच्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र मोहीम घ्यावी, तसेच त्याची सुरूवात सोमवारपासून करावी, असे आदेशही आयुक्तांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)