काका-बाबा गटाचा हातात हात 

उमेश सुतार 

कराड – मलकापूर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकिय वातावरण ढवळून निघाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. राजकीय घडामोडी घडून दोन्हीही गटाचे नेते एकत्र आले. त्यामुळे बाबा व काका गटाने हातात हात घेत राष्ट्रवादीलाही बरोबर घेत भाजपाला रोखण्याची पूर्ण ताकद उभी केली आहे.

मलकापूर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यापासून अनेक चर्चांना ऊत आला होता. आत्तापर्यंतच्या सगळ्या चर्चेत बाबा-काका हातात हात घालून काम करणार का इथपासून डॉ. अतुल भोसले कोणता धमाका करणार इथपर्यतची जोरदार चर्चा चर्चिली जात होती. याबाबत मलकापूरसह तालुक्‍यात उत्सुकता लागून लागली होती. मात्र या सर्व चर्चा व घडामोडींना बुधवारी पूर्णविराम मिळाला. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपासून बाबा-काका गटाच्या मनोमिलनाचे वारे वाहू लागले होते. मात्र त्यावर दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे कोणीही जाहीर घोषणा केली नव्हती.

अनेक वेळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळीही बाबा-काका गटाचे मनोमिलन झाले, असे जाहीरपणे बोलले जात नव्हते. मात्र, मलकापूरच्या निवडणुकीत दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान काळात जागा वाटपावरुन दोन्ही गटांमध्ये पुन्हा संबंध ताणले होते.

अखेर कॉंग्रेसच्या चिन्हावर एकत्रित निवडणूक लढत असताना काही जागांवर उमेदवारी देऊन मनोमिलनावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने सर्वच जरतरच्या चर्चांना विराम पडला आहे. त्यामध्ये उंडाळकर गटाने कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या दोन उमेदवारांना निवडणुकीत उतरवले आहे. तर दुसरीकडे ऍड. राजाभाऊ उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीलाही बरोबर घेत कॉंग्रेसने त्यांना निवडणुकीत एक जागा दिली आहे. जरी एक उमेदवार राष्ट्रवादी समर्थक असला तरी तो कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीत उतरणार असल्याने कॉंग्रेसने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन मलकापूर पालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी अर्ज दाखल करत असताना झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीला सोबत घेत बाबा-काका गट एकत्रितपणे हाताच्या चिन्हावर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे बाबा-काका गटामधील मनोमिलनाची नांदी मलकापूर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.मलकापूर पालिका निवडणुकीसाठी पृथ्वीराजबाबा आणि उंडाळकरकाका गट एकत्र आले असून बुधवारी ऍड. उदयसिंह पाटील, राष्ट्रवादीचे ऍड. राजाभाऊ पाटील, कॉंग्रेसचे मनोहर शिंदे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देत हात मिळवणी केली आहे.

भाजपात तिघेजण दाखल 
मलकापूरच्या निवडणुकीत राजकीय घडामोडीत नाराजी नाट्य घडले. काहीही झाले तरी आपण कॉंग्रेसबरोबर जाण्याचे ठरवले, तसा आदेशही काढला. मात्र उंडाळकर गटाचे सुहास कदम, राजू मुल्ला तर आमदार बाळासाहेब पाटील गटाचे प्रमोद शिंदे यांनी आपल्या नेत्यांचे आदेश डावलत भाजपमधून उमेदवारी मिळवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)