कांस्यपदकाने “त्या’ वेदना भरून येणार नाहीत – श्रीजेश 

नवी दिल्ली- आशियाई स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक कमावले असले, तरी या संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. त्यामुळे पाकिस्तानला नमवून कांस्यपदक पटकावल्यावरही हॉकी संघाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे.

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने आपल्या पाठीराख्यांशी सहमत असल्याचे सांगतानाच मिळालेल्या कांस्यपदकामुळे सुवर्णपदक जिंकू न शकल्याच्या वेदना भरून येणार नाहीत, अशी कबुली दिली आहे. आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाने साखळी फेरीत सफाईदार कामगिरी करत दुबळ्या संघांवर तब्बल 76 गोलची नोंद केली होती. त्यामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत होते.

तथापि, गतविजेत्या भारताला उपान्त्य फेरीत मलेशियाविरुद्ध सडन-डेथमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे या संघाच्या अपयशावर चर्चा सुरू झाली. तसेच या संघावर चहूबाजूंनी टीकाही केली जात होती. कारण उपान्त्य फेरीतील पराभवामुळे भारताला कांस्यपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागले. यामुळे संघावर जास्तच टीका व्हायला लागली. यावेळी हॉकी इंडियाने विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा करा, अथवा तुम्हाला प्रशिक्षकपद सोडावे लागेल असा इशारा प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना दिल्याने भारतीय संघामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आशियाई क्रीडास्पर्धेतील या अपयशामुळे आम्हीही निराश झालो आहोत. भारतीय संघ मागील वर्षभरामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे सुवर्णपदक पटकावण्याची पात्रता या संघामध्ये होती. त्यामुळे कांस्यपदकाने आमच्या वेदना भरून येणार नाहीत, असे सांगतानाच भारतीय संघ अतिआत्मविश्वासामुळे हरल्याची टीका श्रीजेशने खोडून काढली. खेळाडूंना सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास असला, तरी अतिआत्मविश्वास नव्हता. आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकत होतो, मात्र काही चुका आम्हाला महागात पडल्या, असे त्याने सांगितले. आशियाई स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक कोटा मिळवण्यात भारतीय हॉकी संघ अपयशी ठरला असला, तरी भविष्यात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा आत्मविश्वास श्रीजेशने यावेळी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)