कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रु. अनुदान

पणन संचालक तावरे यांची माहिती : बाजार समितीत करता येणार अर्ज

पुणे – राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी बाजार समितींमध्ये दि. 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी 15 जानेवारीपर्यंत कांदा विक्री केलेल्या बाजार समितीमध्ये अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे पणन संचालक दीपक तावरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना सहाय्यासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करावेत, शेतकऱ्यांना मोफत अर्ज उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही तावरे यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी येणारा प्रतिक्विंटल खर्च विचारात घेता, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रसन्ना कृषी मार्केट, पाडळी आळे, जि. नगर या खासगी बाजार समितीतील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळणार आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, नवी मुंबई वगळता सर्व बाजार समित्यासांठी योजना लागू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे. हे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पाठवायचे आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी योग्य प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर ती यादी पणन संचालकांना सादर करण्यात येईल. त्यांनतर पणन संचालनालयातर्फे जिल्हा उपनिबंधिकांना निधी वितरित केला जाईल.

कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रतिक्विंटल 200 रुपये प्रमाणे जास्तीत जास्त 200 क्विंटल कांद्याला अनुदान मिळणार आहे. डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्री पट्टी, 7/12 उतारा, बॅंकेचे बचत खाते, आधार क्रमांक या कागदपत्रासह विक्री झालेल्या बाजार समितीकडे अर्ज सादर करावा. 7/12 ज्यांच्या नावे आहे त्यांच्या बॅंक खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे, विक्री पट्टी नावे असलेल्या व्यक्तीने अनुदानासाठी शपथपत्र सादर करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)