एकादशीनिमित्त बंदीचा आदेश डावलून केली विक्री
नारायणगाव- शासनाचा दारू विक्री बंदचा आदेश असताना कांदळी गावाच्या हद्दीत 14 नंबर येथील एक बिअर बार, परमिट रूम उघडे ठेवून बेकायदेशीर विनापरवाना चोरून देशी-विदेशी दारूचे क्वॉटर्स, बिअरच्या बाटल्या आणि एक दुचाकी असा 1 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सोमवारी (दि. 19) छापा टाकून जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिली.
कांदळी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत 14 नंबर ते भोरवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत अजित नबाजी कुतळ (वय 34, रा. कांदळी, ता. जुन्नर) हॉटेल दीपाली बिअर बार परमिट रूमचा दरवाजा उघडा ठेवून सोमवारी (दि. 19) कार्तिक एकादशीनिमित्त दारू विक्री करणेबाबत बंदचा आदेश असताना बिअर बार-परमिट रूमचा दरवाजा उघडा ठेवून बेकायदेशीर विनापरवाना चोरून देशी-विदेशी दारू विक्री करीत असल्याची माहिती घोडे यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गोंधे आणि त्यांच्या सहकारी पथकाने सोमवारी सायंकाळी छापा टाकला असता दीपाली बिअर बार परमिट रूमचा दरवाजा उघडा ठेवून दरवाजाजवळ मोटार सायकल लावून डीकीमध्ये दारूच्या बाटल्यांचा साठा करून चोरून विक्री करीत असताना अजित कुतळ आढळून आला. परमिट रूमच्या लायसन्सबाबत विचारणा केली असता त्याबाबत आपणास काही माहीत नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्याच्याजवळील देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि दुचाकी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली. भीमा लोढे यांनी याबाबत फिर्याद दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा