कहे गये दास कबीर…

– अरुण गोखले

साधूची ओळख…

-Ads-

   दोहा

साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय।
सार सार को गहि रहै, थोथा देत उडाय।।
मराठी भाषांतर

साधू म्हणावे खरा जयाच्या, अंगी सुपाची वृत्ती।
ठेवूनी घेतो हवे बाकीचे, उडवी वाऱ्यावरती।।

भावार्थ –

हा दोहा म्हणजे कबीरजींच्या द्रष्टेपणाच एक उत्तम उदाहरण आहे. या दोह्यात त्यांनी खऱ्या साधूची आणि संताची नेमकी ओळख सांगितली आहे. त्यांनी ह्या दोह्यात साधूवृत्तीला, संतपणाला सुपाची उपमा दिली आहे. ती उपमा अगदी सार्थ आहे. सूप….. प्रपंचातल्या गृहिणीच्या नित्य वापरातली धान्य पाखडायची ही एक वस्तू. तिचा वापर खरं तर आपण जवळ जवळ रोजच करीत असतो. पण आपल्या नित्य वापरातली एखादी वस्तूही आपल्याला नेमकं काय शिकवते, हे पाहण्याची दृष्टी मात्र आपल्याकडे नसते. ती असते खऱ्या द्रष्ट्याकडे. कबीर हे एक असेच सच्चे द्रष्टे. त्यामुळे ते आपल्याला काय घ्या, आणि काय टाका, काय जवळ करा आणि काय दूर सारा, हे सूपाच्या उदाहरणावरुन आपल्याला छान समजावून देतात.

इथे त्यांना हेच सुचवायचे आहे की आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे नीट निरीक्षण करा. त्यांच्याकडून जे घेण्यासारखे आहे ते घ्या. पाखडणे ही सुपाची कृती काय साध्य करते? तर ती धान्याचे दाणे आपल्या जवळ राखून ठेवते, आणि नको असणारा भुसा, कोंडा हा वाऱ्यावर उडवून लावते. कबीर म्हणतात, तुम्ही पण तसेच करा. सुपाकडून तुम्ही तो गुण घ्या.
आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वच व्यक्‍त ह्या काही सर्वगुणसंपन्न असतात असे नाही.

पण ह्याचा अर्थ असाही नसतो की त्यांच्याकडून काहीच घेण्यासारखे, स्वीकारण्यासारखे नसते. एखाद्याचं रागावणं बघू नका तर त्याच त्या मागचं प्रेम पाहा. कोणाच्या रूपाकडे नाही तर त्याच्या गुणाकडे लक्ष द्या. औषध कडू लागतय म्हणून त्याचा त्याग करु नका तर पुढे होणारा त्याचा गोड परिणाम लक्षात ह्या आणि ते सेवन करा. काय घ्यायचं आणि काय सोडायचं ही निवड ज्याची त्याला करता आली पाहिजे. जे चांगलं आहे, स्वीकारण्यासारखं आहे ते घ्या, नको ते दूर सारा.साधूंची ही सुपासारखी पाखडणी करण्याची कला तुम्ही शिकून घ्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)