#कहे कबीर: प्रभू प्रेमाविण… 

अरुण गोखले 

दोहा- 

-Ads-

जो घट प्रेम न संचरे, सो घट जान समान।
जैसे खाल लुहारकी, सॉंस लेत बिन प्राण।।

मराठी भाषांतर- 

ज्या देही ना प्रेम संचरे, तो मानी त्या समान रे।
श्‍वास घेई परि प्राण न ज्यात लोहाराचा भाता रे।।

भावार्थ- 
दुसऱ्याला एखादी गोष्ट ही अचूक आणि नेमक्‍या शब्दांत कशी सांगावी, कशी शिकवावी कशी पटवावी” त्यासाठी एखादे अचूक उदाहरण कोणते द्यावे ही गोष्ट शिकावी ती कबीरांकडूनच. माणसाचे माणूसपण कशाने टिकते, त्याच्या मनात खरा मानवताधर्म कशाने जागतो? त्याची सर्वांशी जवळीक कधी साधते, तो सर्वप्रिय कधी होतो.
ह्याचे अचूक उत्तर देताना ते ह्या दोह्यातून असे सांगतात की अंत:करणातील इतरांबद्दलचं असणार प्रेम, दया, जिव्हाळा, आपुलकी हे माणसाच्या माणूसपणाच खरं लक्षण आहे.

ते स्पष्टपणे असं म्हणतात की ज्या माणसाच्या मनात ही प्रेमभावना नाही तो माणूस, तो देह हा माझ्यालेखी क्षणोक्षणी खालीवर होणाऱ्या, श्‍वासोच्छ्वास घेणाऱ्या परंतु ज्याच्यात प्राण नाही अशा लोहाराच्या भात्यासारखा आहे. तो लोहाराचा भाता हा एकसारखा खालीवर होत असतो. जणू काय श्‍वास घेत असतो, सोडत असतो, पण त्या लोहाराच्या भात्यात जीव आहे का? प्राण आहे का? नाही. तसाच जो मानवी देह प्रेमरहित आहे.

ज्यात प्रेम नाही, माया नाही, आपलेपणा नाही, जिव्हाळा नाही. त्याला माणूस कसा म्हणायचा? हृदयात इतरांबद्दल प्रेम असणं हेच माणसाचं माणूस असल्याच खरं लक्षण आहे. इतरांच्या बद्दलची सहृदयता ही त्याच्या जिवंतपणाची खूण आहे.
प्रत्येकालाच इतरांबद्दल नेहमीच प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा हा वाटायला हवा. तसाच तो प्रत्येक जीवाला त्याच्या आत्मकल्याणासाठी त्या प्रभूबद्दलही वाटायला हवा. त्या ईश्‍वरासाठी मनात आपलेपणाची ओढ हवी, प्रेम हवं, त्याच्या वियोगाची हुरहूर हवी. त्या प्रेमापोटी डोळ्याला भक्‍तीचा पाझर यायला हवा.

ईश्‍वर भेटीची ओढ त्याच्या मनाला लागायला हवी. दुसऱ्याबरोबरच त्याने आपल्याही प्राप्त नरजन्माचे सार्थक कसे होईल ह्याचा विचार करायला हवा. तसे प्रयत्न करायला हवेत. तो ध्यास धरायला हवा.
ज्या देहात प्रभू प्रेमरस नाही. भक्‍तीचा जराही ओलावा नाही, माणुसकीचा पाझर नाही, त्या जीवाला स्वत:चे आणि इतरांचे कल्याण हे तरी कसे साधता येणार?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)