कहे कबीर : प्रभू प्रेमाचा मेघ….   

अरुण गोखले 

कबीर बादल प्रेमका, 
हम पर बरसा आई। 
अंतरि भिगी आतमा, 
हरी भई बनराई।। 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभू प्रेमाचा मेघ येऊनी, 
मजवर वर्षूनी गेला। 
भिजला अंतरीचा तो आत्मा, जीवन फुलवूनी गेला।। 

पाण्याचेच एक दुसरे नाव आहे ते म्हणजे जीवन. हे जीवन नसेल तर आयुष्याचे वैराण वाळवंट व्हायला वेळ लागत नाही. ज्याप्रमाणे पाण्याअभावी विराण झालेले, होरपळलेले, भेगाळलेले, माळरान हे पुन्हां फुलण्यासाठी पाणी हवे. नवे बीज अंकुरण्यासाठी, नवी वनराई फुलण्यासाठी, सारा परिसर परत हिरवागार होण्यासाठी, त्या मेघकृपेच्या सहस्त्र अमृतधारांची गरज असते. हे जसं निसर्गात हवं तसंच उदास विराण झालेले, परिस्थितीने होरपळलेले, दु:खानी खचलेले, पिचलेले, मानवी जीवन हे पुन्हां नव्याने उभे राहण्यासाठी, त्याला आशेची नवी पालवी फुलण्यासाठी प्रभूप्रेमाच्या वर्षावाचीच गरज असते.

निसर्गातला हा दाखला मानवी जीवनाशी जोडत असताना कबीर म्हणतात की, ज्या जीवनात प्रभू प्रेमाचा ओलावा नाही. जिथे ईशकृपेचा मेघ वर्षत नाही. तिथे अशी मानवी जीवन बाग उजाड झालेलीच पहायला आणि अनुभवायला मिळते.

कबीर त्या प्रभू प्रेमाच्या वर्षावाची मानवी जीवनात गरज काय? हे सांगताना स्वत:चे उदाहरण देतात. ते प्रामाणिकपणे ह्या गोष्टीची ग्वाही देतात की जेव्हा तो हरीकृपेचा प्रेममेघ माझ्या जीवनात बरसला, तेव्हाच माझेही उजाड जीवन हे फुलून आले. जेव्हा मी दिवस दिवस त्या ईश्‍वराच्या अनुसंधानात बुडून राहू लागलो, तेव्हा त्या ईश नाम आणि चिंतनाच्या साधनेतून माझ्यावर प्रभू प्रेमाच्या कृपामेघाची बरसात झाली. त्या सुखद शतधारांनी केवळ माझी कायाच नाही तर माझा अंतरात्माही चिंब न्हाऊन निघाला. माझे अशांत मन शांत झाले. एक आगळावेगळा आनंद मला सुखवून गेला. ती प्रभूकृपा माझा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी सार्थ करून गेली. प्रभू प्रेमवर्षावाने मी मनोमन सुखावलो. माझी सारी चिंताही हरीनेच वाहिल्याने माझ्या आवश्‍यक त्या सर्व प्रापंचिक गरजाही पूर्ण झाल्या. मला जे आणि जेवढे हवे ते त्याच्या कृपेनेच मिळाले. तिकडे माझी अंतरात्मा सुखावत असताना इकडे माझे विराण झालेले, निराश उदास आणि भयाण झालेले जीवन ही पुन्हा त्या निसर्गातील वनराईप्रमाणेच फुलून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)