कहे कबीर : देख कबीरा रोया..

अरुण गोखले 
चलती चक्की 
देख के, 
दिया कबीरा रोय। 
दो पाटन के बीच में, 
साबूत बचा न कोए।। 
कबीर लागले रडू पाहता, 
फिरते जाते गरा गरा। 
सुटे जीव ना दो पाळ्यातून, 
भरडूनी निघतो भराभरा।। 
भावार्थ- परपीडेने ज्याचे मन व्याकूळ होते तोच खरा संत. एकदा गावातून राम भजन करीत फिरत असताना कबीरांनी एका स्त्रीस घराच्या ओसरीवर बसून जात्यावर दळण दळताना पाहिले. ते गरागरा फिरणारे जाते, दोन्ही पाळ्यातून भसाभसा खाली पडणारे पीठ, हे पाहता पाहता एकाऐकी कबीर रडायला लागले. त्यांना तसे रडताना पाहून ती बाई आणि अवती भवतीच्या सर्वच लोकांना आश्‍चर्य वाटायला लागले की कबीरांना असे रडण्याचे कारण काय?
तेवढ्यात समोरून निपटनिरंजन नावाचे एक महान साधू महात्मा आले. त्यांनी कबीराला त्या जात्याकडे पाहून स्फुंदून स्फुंदून रडताना पाहिले. तेव्हा त्यांनीही कबीराला विचारले “”काय रे बाबा! काय झाले? तू असा का आणि कशासाठी रडतो आहेस?'” तेव्हा कबीर म्हणाले “महाराज! मला त्या जात्यात भरडून पीठ होणाऱ्या दाण्याकडे पाहून रडू येते आहे.
त्यावर महात्मा म्हणाले “अरे त्यात रडण्यासारखे काय आहे. जो दाणा जात्यात पडला, तो भरडला, दळला जाणारच” त्याचे पिठ होणारच. ते तर अटळच आहे. “महाराज! या जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यासारखाच मनुष्यप्राणी हा सुद्धा जन्म मरणाच्या जात्यात असाच भरडला जातोय. त्याचेही असेच पीठ होते आहे. यातून जीवाची सुटका कशी होणार? या विचारांनी मला रडू येत आहे? तेव्हा कबीराच्या मनातील ती लोककल्याणाची भावना लक्षात घेऊन त्या महात्म्याने कबीरास प्रत्यक्ष दाखवून असा बोध केला की जे दाणे जात्याच्या खुंट्याला घट्ट धरून असतात. त्यांचे पीठ होत नाही. तसे जे भगवंताच्या नामापाशी, चिटकून असतात. त्या जीवांचे पीठ होत नाही ते सांभाळले जातात.
महात्म्याचा तोच बोध कबीरांनी स्वत:च्या मनाला लावून घेतला. त्यांनी आपल्या दोह्यातून, पदातून, साक्‍यातून तोच बोध सर्व जीवांना केला, की बाबाहो! राम नाम जपा. नामाच्या खुंट्याशी प्रामाणिकपणे चिटकून राहा. त्यातच तुमचे कल्याण आहे. आधी केले मग सांगितले असा हा कबीरांचा बोध खरोखरच आचरणात आणण्यासारखा आणि जन्माचे सार्थक करून घेण्यासारखाच आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)