कहे कबीर : तुझा देव तुझ्या आतच…   

अरुण गोखले 

ज्यों तिल माहि तेल हैं, 
ज्यों चकमक में आग। 
तेरा साई तुझं ही में हैं, 
जाग सके तो जाग।। 

-Ads-

तीळात आहे तेल जसे ते, 
अग्नीमधे तो प्रकाश। 
तसा तुझा रे देव तुझ्यात, 
शोधूनिया बा घे त्यास।। 

ईश्‍वराचा शोध हे मानवी जीवनाच खरं साध्य आहे. पण होत काय, की तो तसा ईश्‍वराचा शोध घ्यावा असे कुणाला वाटत नाही. ज्यांना वाटते ते योग्य मार्गानी शोध घेत नाहीत. कारण तो कसा आहे? कुठे आहे? त्याचा शोध कोणत्या मार्गानी घ्यायचा, हेच आम्हाला कळत नाही. नेमके तेच समजावून सांगताना कबीरजी दोन समर्पक उदाहरणे देतात. पहिले उदाहरण ते तिळाचे देतात. ते म्हणतात तेल जसे तिळात असते. ज्याप्रमाणे तेज/ प्रकाश हा अग्नीमध्ये सामावलेला असतो. त्याप्रमाणेच हे माणसा! अरे तू ज्याला शोधतो आहेस ना? तो तुझा देव हा तुझ्याच आत आहे.

ही देवाची आतली जागा नेमकी कोणती? हे साधूसंत, संतपुरुष आणि सदगुरू ह्यांनाच ठाऊक असते. माणूस देव दगडा मातीच्या मूर्तीत, मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात शोधत असतो. त्याला जन्माबरोबर नाळ कापतात त्या स्वत:च्या अहं ब्रह्मास्मि ह्या अवस्थेचा विसर पडतो. मी ईश्‍वराचा अंश आहे. तो मीच आहे हे जीव विसरतो. “स्व’च्या “मी’च्या गुंत्यात गुंतत जातो. तिकडे त्याचा विसर पडतो आणि इकडे जीवाचा मी हा वाढत जातो. जीवनातले यशापयश, सुख दु:ख, लाभ हानी माणूस मीशीच जोडत जातो. त्याला चालविणाऱ्या, बोलविणाऱ्या, खेळवणाऱ्या ईश्‍वरी आत्मशक्तीचा त्याला सोईस्करपणे विसर पडतो. देवाचं देण हे तो आपलं कर्तृत्व म्हणून मिरवायला लागतो. त्याला त्याच्याच अंतरंगात असलेली आत्मसत्ता कळत नाही. ती श्‍वासाची बासरी वाजविणारा बन्सीधर त्याला कळत नाही, दिसत नाही. कबीरांना सांगायचे आहे की त्याचा शोध हा डोळे उघडून नाही तर जगाकडे पाठ फिरवून, एकांतात बसून आणि डोळे मिटून आपणच आपल्या आत घ्यायचा असतो.

ही देव शोधाची प्रक्रिया जरी उलटी असली तरी तो कळण्यासाठी आपल्याला आपलं मन आणि वृत्ती ह्या आतच वळवायला लागतात. प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असलेला तो आत्माराम हा आपण द्रष्टेपणानी पाहायला हवा आणि त्याचा शोध घ्यायला हवा. हे माणसा! तो तुझ्यातला देव तूच शोधून घे. तो इतर कोठे नाही तर तुझ्याजवळ, तुझ्याच आत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)