दुबई: भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तर चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने या क्रमवारीत सहावे स्थान पटकावले आहे. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन स्थानांची बढती घेत पुन्हा अव्वल 20 क्रमांकांत स्थान मिळवले आहे.

कोहलीने इंग्लंडच्या दौऱ्यात आतापर्यंत 544 धावा केल्या आहेत. त्यानुसार 937 गुणांसह विराट अव्वल स्थानावर विराजमान आहे. सार्वकालिक गुणांकनाच्या यादीत विराट 11व्या स्थानी आहे. चेतेश्‍वर पुजारा अव्वल दहा फलंदाजांमध्ये असलेला दुसरा भारतीय फलंदाज असून चौथ्या कसोटीतील कामगिरीमुळे तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. सामन्यापूर्वी त्याचे 763 गुण होते, मात्र चौथ्या कसोटीतील नाबाद 132 धावांच्या खेळीने त्याला 25 गुणांचा फायदा झाला असून त्याने 798 गुणांसह सहाव्या स्थानी झेप घेतली.

सामन्यात सहा बळी घेणाऱ्या शमीला 19 व्या स्थानी बढती मिळाली असून इशांत शर्मा 25व्या स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह 487 गुणांसह 37व्या स्थानी आहे. मात्र मालिकेत एकही सामना न खेळलेला रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा प्रतिभावान खेळाडू सॅम करनला 29 स्थानांचा फायदा झाला असून तो फलंदाजांच्या क्रमवारीत 43व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच गोलंदाजांच्या यादीत करन 55व्या स्थानी असून अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 27 स्थानांची बढती घेऊन तो 15व्या स्थानी पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)