मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हा क्रिकेटचा अविभाज्य भाग असल्याचे क्रिकेट समितीने मान्य केले आहे. कसोटी क्रिकेटमधून नाणेफेकीची प्रथा संपुष्टात येणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. परंतु मुंबईत झालेल्या बैठकीत कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक कायम ठेवण्यावर सहमती झाली. या निर्णयामुळे कसोटी सामना सुरु होण्याआधी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय नाणेफेकीनेच होईल.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. खेळाडूंच्या वर्तवणुकीबाबतच्या शिफारशी, जागतिक क्रिकेट संचालक मंडळाकडून कठोर पावले उचलणे तसेच खेळाडू आणि प्रतिस्पर्धी संघांमध्येट सन्मानाची भावना कायम राहण्याबाबत कुंबळे यांनी बाजू मांडली.

नाणेफेकदरम्यान यजमान देशाचा कर्णधार नाणं उडवतो आणि त्यानंतर पाहुण्या संघाचा कर्णधार छापा किंवा काटा सांगतो. पण यामुळे यजमान संघाला फायदा मिळतो. यानंतर खराब पीच बनवण्याची प्रकरणं समोर येतात. परिणामी नाणेफेकीचं मूल्य राहत नाही, असा दावा टॉसच्या विरोधात बोलणारे करत आहेत. टॉसऐवजी पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणाचा पर्याय दिला जाऊ शकतो. त्यामुळे तटस्थ पीच बनण्याची शक्यता जास्त असेल, असा दावा केला जात आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची परंपरा 141 वर्ष जुनी आहे. कसोटी स्पर्धेत यजमान संघाला आपल्याच घरच्या मैदानावर खेळताना फायदा मिळतो, असा तर्क टॉस बंद करण्यामागे लढवला जात आहे. कसोटी क्रिकेटची सुरुवात 1877 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमध्ये मेलबर्नच्या एमसीजी ग्राऊंडमधील सामन्यातून झाली होती. तेव्हापासून सामन्याच्या आधी नाणेफेक करुन कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोण क्षेत्ररक्षण करणार हे ठरवलं जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)