कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची परंपरा होणार बंद ?

मुंबई : क्रिकेटमध्ये टॉस अर्थात नाणेफेक अतिशय महत्त्वाची समजली जाते. प्रत्येक सामन्याआधी नाणेफेक करुन कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणार हे ठरवले जाते. पण कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची ही 141 वर्षांची जुनी परंपरा बंद करण्याबाबत विचार सुरु आहे. सामन्याआधी होणारा टॉस बंद करण्याचा विचार आयसीसी करत आहे. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या क्रिकेट समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. जर यावर सहमती झाली तर 2019 मध्ये सुरु होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेपासून नाणेफेक बंद केली जाईल.

कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची परंपरा 141 वर्ष जुनी आहे. कसोटी स्पर्धेत यजमान संघाला आपल्याच घरच्या मैदानावर खेळताना फायदा मिळतो, असा तर्क टॉस बंद करण्यामागे लढवला जात आहे. कसोटी क्रिकेटची सुरुवात 1877 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमध्ये मेलबर्नच्या एमसीजी ग्राऊंडमधील सामन्यातून झाली होती. तेव्हापासून सामन्याच्या आधी नाणेफेक करुन कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोण क्षेत्ररक्षण करणार हे ठरवले जाते.

नाणेफेकदरम्यान यजमान देशाचा कर्णधार नाणे उडवतो आणि त्यानंतर पाहुण्या संघाचा कर्णधार छापा किंवा काटा सांगतो. पण यामुळे यजमान संघाला फायदा मिळतो. यानंतर खराब पीच बनवण्याची प्रकरणे समोर येतात. परिणामी नाणेफेकीचं मूल्य राहत नाही, असा दावा टॉसच्या विरोधात बोलणारे करत आहेत. टॉसऐवजी पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणाचा पर्याय दिला जाऊ शकतो. त्यामुळे तटस्थ पीच बनण्याची शक्यता जास्त असेल, असा दावा केला जात आहे.

आयसीसी क्रिकेट समितीमध्ये भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्याशिवाय अँड्र्यू स्ट्रॉस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट, अंपायर रिचर्ड केटेलबोरोग, आयसीसी सामनाधिकारी रंजन मदुगले, शॉन पॉलक आणि क्लेरी कोनोर यांचा समावेश आहे. अनिल कुंबळेंच्या अध्यक्षतेखालील या समितीचे काही सदस्य कसोटी क्रिकेटमधून टॉस बंद करण्याच्या बाजूने आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आयसीसी क्रिकेट समितीची मुंबईत बैठक होणार आहे. पण त्याआधीच कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक बंद करण्याचा विचार सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)