कसोटीची निवडणूक (अग्रलेख)

राजस्थानातही अशोक गेहलोट आणि सचिन पायलट यांचे दोन गट कार्यरत आहेत. या दोनही गटांना एकत्र करुन भाजपसमोर आव्हान उभे करण्याचे काम कॉंग्रेसला करावे लागेल. एकूणच कॉंग्रेससाठी अनुकुल परिस्थितीत असली तरीही सत्ताधारी भाजप आणि त्यांचे नेतेही गप्प बसतील असे नाही. सत्ता राखण्यासाठी जीवाचे रान केले जाईल. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा सत्ता कायम राखण्याकरिता जोर लावतील यात शंका नाही. 
लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल किंवा मिनी लोकसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असल्याने देशात पुन्हा एकदा रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांनी लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने या निवडणुकीतील कौल निश्‍चितच महत्वाचा आहे. मिझोराम, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगड या राज्यांमधील ही निवडणूक सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष कॉंग्रेस या दोघांसाठीही कसोटीची ठरणार आहे, यात शंका नाही. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपची दीर्घकाळ सत्ता आहे.ती सत्ता राखण्याची आव्हान भाजपला पेलावे लागणार आहे.
मिझोराममध्ये गेली 15 वर्षे कॉंग्रेसची सत्ता आहे. ईशान्य भारतात भाजपचा वाढता प्रभाव पहाता या राज्यात भाजपचा शिरकाव होऊ नये म्हणून कॉंग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत.तेलंगणमध्ये या दोन्ही पक्षांचे फारसे अस्तित्व नसले तरी ते दाखवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. म्हणूनच या दोन्ही पक्षांची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. या निवडणुकींची घोषणा होत असतानाच घडलेल्या दोन घटनांनी या दोन्ही पक्षांना विचार करायला लावला आहे.
“मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणूकीसाठी आघाडीचा निर्णय घेण्यासंदर्भात समाजवादी पार्टी कॉंग्रेसच्या निर्णयाची अधिक वाट बघू शकत नाही’, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. “कॉंग्रेसने आम्हाला खूप वाट बघायला लावलली.आघाडीबाबतचा निर्णय घेण्यासाठी वेळ निघून चालला आहे आणि आम्ही अधिक काळ वाट बघू शकत नाही. मध्यप्रदेशात सपाच्यावतीने आता गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि बसपाबरोबर आघाडीशी चर्चा केली जाईल’, असे संकेत अखिलेश यांनी दिले आहेत. त्या आधी दोनच दिवसांपूर्वी बसपा नेत्या मायावती यांनी, “राजस्थान आणि मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसबरोबर आघाडी न करण्याचा’ निर्णय जाहीर केला होता. “सोनिया आणि राहुल गांधी यांना बसपाबरोबर आघाडी हवी आहे, मात्र काही स्वार्थी नेत्यांमुळे आघाडी होऊ शकत नसल्याचे’ त्या म्हणाल्या होत्या.
कॉंग्रेसच्या प्रस्तावित महाआघाडीतील दोन प्रमुख पक्षांची ही मानसिकता कॉंग्रेससाठी चिंताजनक ठरु शकते. दुसरीकडे निवडणुका जाहीर होत असतानाच काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केलेले जनमत चाचण्यांचे निष्कर्ष भाजपसाठी चिंता वाढवणारे ठरणार आहेत. या चाचणीमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जादू चालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागण्याची शक्‍यत वर्तवण्यात आली आहे. कॉंग्रेसला या राज्यांमध्ये बहुमत मिळू शकते असा अंदाजही या चाचणीत व्यक्त करण्यात आला आहे. देशात ज्या राज्यात भाजपची सर्वात जास्त ताकद आहे त्याच राज्यात पक्षाला सत्ता गमवावी लागली तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो.
मध्यप्रदेशात वर्ष 2003 पासून भाजपा सत्तेत आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा चांगली असली तरी सरकारविरोधातील नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो. त्यातच व्यापमं घोटाळा, आंदोलक शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आणि कॉंग्रेसचा वाढत चाललेला प्रभाव पहाता, चौहान यांना सत्ता टिकवण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मध्य प्रदेशसारखाच निकाल शेजारच्या छत्तीसगडमध्ये लागण्याचा इतिहास पाहिला तर रमणसिंग यांनाही सत्ता सोडावी लागण्याचे संकेत आहेत. रमणसिंग यांचे काम चांगले असले तरी नाराजीचा फटका त्यांनाही बसला तर आश्‍चर्य वाटायला नको. राजस्थानात भाजपा आणि कॉंग्रेसला आलटून पालटून सत्ता मिळाली आहे. ही पंरपरा कायम राहिल्यास यंदा कॉंग्रेसला संधी आहे. दुसरीकडे वसुंधराराजे यांच्याबाबतीत पक्षातही नाराजी आहे. मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या त्यांच्या काही निर्णयांमुळे जनतेतही नाराजी आहे. एकंदर अशी परिस्थिती पहात कॉंग्रेसचा प्रवास सोपा आहे असे वाटत असले तरी या पक्षालाही काळजी घ्यावीच लागणार आहे.
कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीपासून सावध रहावे लागणार आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजयसिंह यांचे पटत नाही. दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद उपभोगलेले दिग्विजयसिंह यांच्याकडे गेला काहीकाळ दुर्लक्ष झाले आहे.त्याला कारणीभूत त्यांचा फटकळपणाच होता. वाटेल ती वक्तव्ये करुन पक्षाला अडचणीत आणणाऱ्या दिग्विजय सिंह यांना बाजुला सारुन पक्षाने जोतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाला संधी दिली आहे. त्याची नाराजी दिग्वीजयसिंग यांच्या मनात आहेच. हे सारे पहाता कॉंग्रेसला आता या पक्षांतर्गत नाराजीचा आणि गटबाजीचा फटका बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
राजस्थानातही अशोक गेहलोट आणि सचिन पायलट यांचे दोन गट कार्यरत आहेत. या दोनही गटांना एकत्र करुन भाजपसमोर आव्हान उभे करण्याचे काम कॉंग्रेसला करावे लागेल. एकूणच कॉंग्रेससाठी अनुकुल परिस्थितीत असली तरीही सत्ताधारी भाजप आणि त्यांचे नेतेही गप्प बसतील असे नाही.सत्ता राखण्यासाठी जीवाचे रान केले जाईल. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा सत्ता कायम राखण्याकरिता जोर लावतील यात शंका नाही. बुथ मॅनेजमेंटच्या जोरावर आजपर्यंत निवडणुका जिंकणारे अमित शहा पक्षाची आणि सरकारची संपुर्ण ताकद लावतील असेच संकेत आहेत. ही निवडणूक सत्ताधार भिाजपसह सर्वाचीच कसोटी पहाणारी ठरेल यात शंका नाही.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)