कसा जिंकणार “अमृतातेंही पैजा’

प्रशांत घाडगे

जागतिक मराठी भाषा दिन
मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा, राजभाषा व ज्ञानभाषा आहे. “माझा मराठाचि बोलू कवतिकें, परि अमृतातेंही पैजा जिंके’, असा दुर्दम्य आशावाद जागवत संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी मराठीची थोरवी गायली आहे. याच मराठीचिये नगरी महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांना उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे प्रचंड ओघ आणि मराठी माध्यमाच्या शाळा ओस असे विदारक चित्र पिंपरी-चिंचवड शहरातही दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका व खासगी मराठी शाळा ओस पडू लागलेल्या आहेत. शहरात पूर्वी केवळ उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्गातील मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दिसत होती. परंतु, सद्यस्थितीत गल्लीपासून-खेड्यापाड्यापर्यत इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. ही परिस्थिती मराठी माध्यमातील शाळांसाठी निश्‍चितपणे धोकादायक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर “कुसुमाग्रज’ यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या निमित्त दरवर्षी सरकार मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविते. परंतु, या उपक्रमातून कोणतेही फलित साध्य होताना दिसत नाही. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या 84 तर इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा आहेत. तसेच, शहरात 398 अधिकृत खासगी शाळा असून यापैकी 183 मराठी माध्यमाच्या व 215 इंग्रजी माध्यमांच्या आहेत. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पाल्याच्या प्रवेशासाठी रात्रंदिवस रांगा लावून उभे राहणारे पालक दरवर्षी आपण पाहतो. या रांगा दरवर्षी वाढत जाणे मराठी माध्यमांच्या शाळांचे दुर्भाग्यच आहे. मराठी माध्यमाच्या शाळा या बहुतांशी सरकारी अनुदानावर चालणाऱ्या आहेत. जागतिकीकरण आणि संगणकाच्या युगात इंग्रजीची भुरळ पडणे, अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, प्रचंड शुल्क भरुनही इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच पाल्याला शिकविण्याचा अट्टाहास होताना दिसत आहे.

मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक शहरांतील मराठी शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. दुसरीकडे कमी पटसंख्येसारखे अव्यवहार्य कारण देऊन राज्यातील तेराशेहून अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. महाराष्ट्राभर मराठी शाळांची अवस्था बिकट असली तरी मातृभाषेतून शिक्षण हे अतिशय आवश्‍यक आणि महत्त्वाचे आहे. आजवर अनेक साहित्यिक, कलावंत, अभिनेते, विचारवंत, उद्योजक मराठी माध्यमाच्या शाळेनेच घडविले आहेत. तरीही स्पर्धेच्या युगात मराठी शाळांची पीछेहाट होताना दिसते. मराठी शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत पुढे असूनही त्यांच्यावर सरकारी शाळेचा विद्यार्थी म्हणून विशिष्ट अनास्थेचा आणि दर्जाहीनतेचा शिक्का बसतोय.

खेड्यापाड्यांमध्येही खासगी इंग्रजी शाळांचे आक्रमण होत असताना ग्रामीण भागातील शिक्षकांनी मोठ्या हिंमतीने आक्रमण थोपवून धरले आहे. काही ठिकाणी इंग्रजी शाळांतून मराठी माध्यमांत परतलेल्या मुलांची संख्या मोठी आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने खेड्यातील शाळांप्रमाणे शहरातील शिक्षकांनीही मराठी शाळा वाचविण्याची मोहीम हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. मायमराठी साता-समुद्रापार सीमा ओलांडून केंव्हाच जगभरात पोहचली आहे. मराठीला आगामी काळात भरभराटीचे दिवस नक्कीच येऊ शकतात. परंतु, राज्यकर्ते आणि समाजातील इतर घटकांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी इच्छाशक्‍ती दाखविली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)