कसबा माझ्यासाठी देवघरासमान : बापट

प्रचाराच्या सांगतासभेत जनतेप्रती व्यक्त केला कृतज्ञता भाव

पुणे – “कसब्याने मला आशीर्वाद, विश्‍वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पाच वेळा आमदार, आणि मंत्री होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे प्रेम करणाऱ्या येथील जनतेही आणि कार्यकर्त्यांची आहे. कसबा हा केवळ माझ्यासाठी मतदार संघ नसून कसबा हे माझे स्फूर्तीस्थान, घर आणि त्यापुढे जाऊन सांगायचे झाल्यास देवघरासमान आहे. अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी कृतज्ञता भाव व्यक्त केला.

प्रचाराची सांगता सभा रविवारी कसबा गणपतीसमोर पार पडली. यापूर्वी कसब्यातून प्रचार यात्रा काढली या यात्रेची सुरुवात समताभूमीपासून झाली. नाना पेठ, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, नवी पेठ, दत्तवाडी, सारसबाग, बाजीराव रस्ता, शनिवारवाडामार्गे ही प्रचार यात्रा कसबा गणपतीजवळ या यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी कसबा मंदिराजवळ झालेल्या सभेत ते होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक राजेश येनपुरे, विशाल धनवडे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, धिरज घाटे, हेमंत रासने, सुलोचना कोंढरे, गायत्री खडके, योगेश समेळ, विष्णू आप्पा हरिहर, सुहास कुलकर्णी, भारत निजामपुरकर, संजय देशमुख, प्रमोद कोंढरे, राजू परदेशी, वैशाली नाईक, छगन बुलाखे, मदिना तांबोळी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
बापट म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून कसब्यातील विविध घटकांचे प्रश्‍न सोडविण्याची मला लाभलेली संधी ही ईश्वरसेवाच आहे, असे मी समजतो. कसब्यासारख्या मतदार संघातून 25 वर्षे आमदारपदी काम केले. यात माझे श्रेय अजिबात नाही.’ तर महापौर, उपमहापौर यांनी मनोगत व्यक्त केले. पुणे कॅन्टोमेंट आणि वडगाव शेरी भागातही त्यांनी प्रचारफेरी काढली.

कॉंग्रेसवर टीका
या देशाचे तुकडे करण्यापासून ते या देशात जाती-धर्मात भांडण लावण्याच काम गोऱ्या ब्रिटीशाने केले. 150 वर्षे राज्य करून ते गेले पण त्यांच्याच मनसुब्यांना खतपाणी घालण्याचे काम कॉंग्रेसने आजवर केले. ब्रिटीश गेला अन्‌ देशात अशांतता पसरायला कॉंग्रेसच्या रूपाने तो पुन्हा आला. अशा शेलक्‍या शब्दांत बापट यांनी विरोधकांवर आरोप केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)