अरुण गोखले 

एखाद्यावर देव प्रसन्न झाला. त्याच्या समोर काय हवे ते माग, असं जरी म्हणाला, तरी त्यावेळी नेमकं काय आणि कसं मागायचं हे माणसाला कळत नाही. एका जवळ जवळच्या गावात दयाराम आणि गंगाराम नावाचे शेतकरी मित्र राहात होते. दयाराम हा अतिशय प्रामाणिक, समाधानी आणि कष्टांळू होता. तर गंगाराम काहीसा स्वार्थी, लोभी, हावरा आणि इतरांना मदत न करण्याच्या वृत्तीचा होता. दयाराम आणि गंगाराम दोघंही शेतकरीच. एकाची शेती या टोकाला तर दुसऱ्याची दुसऱ्या टोकाला.

एके वर्षी काय झाले. पहिला पाऊस आला, जमीन भिजली आणि सर्वांनीच मोठ्या आशेने आपापल्या शेतात पेरणी केली. पण त्यानंतर पावसाने अशी काही हुलकावणी दिली की त्या हंगामातला पुढचा पाऊसच पडला नाही. सारेजण हवालदिल झाले. देवाचा धावा करू लागले.

दयाराम आणि गंगाराम यांनीपण अगदी मनापासून देवाचा धावा केला. देवाला कळकळून प्रार्थना केली. तेव्हा देव प्रसन्न झाला आणि त्यांच्यापुढे येऊन म्हणाला, बोल गंगाराम! तुझी काय मागणी आहे? त्याबरोबर गंगाराम पुढे सरसावला आणि म्हणाला, देवा! तू मला असा वर दे की माझ्या शेतात खूप मोठा पाऊस पडू दे खूप पाणी मिळूदे. देवाने त्याची ती मागणी ऐकली आणि देव म्हणाला “तथास्तू’.

देवाने तोच प्रश्‍न दयारामास विचारला, बोल तुझी काय मागणी आहे?. तेव्हा देवाला हात जोडत दयाराम म्हणाला, देवा! माझं तुझ्याकडे इतकंच मागणं आहे की माझ्या शेताजवळून जाणाऱ्या पाटाला भरपूर पाणी खळाळत राहू दे. दयारामाची ती मागणी ऐकून देव त्याला ही तथास्तू । असे म्हणाला आणि अदृष्य झाला.
दोनच दिवसांनी त्या गावात असा काही भरपूर पाऊस पडला की गंगारामाच्या मागणी प्रमाणे त्याच्या शेतात सगळीकडे पार पाणीच पाणी झालं. पण त्याचा परिणाम मात्र असा झाला की जादा पाण्यामुळे त्याच्या शेतातील पिकाची वाट लागली. पीक कुजून गेलं.

तिकडे दयारामाच्या मागणीप्रमाणे शेताजवळचा पाट पाण्यानी खळखळून वाहू लागला. त्याने त्या पाण्याचा योग्य असा वापर केला आणि देवकृपेने त्याच्या शेतात त्याला चांगले पीक मिळाले. देवानी दोघांची मागणी पुरी केली. त्यात चूक जर झालीच असेल तर मागणाऱ्याची. कारण देवानी तर ज्याने जे मागितले ते तसे दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)