कशाला हवी “नवी वर्गवारी’? (भाग-2)

देशभरातील टोलनाक्‍यांवर न्यायाधीश आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींसाठी स्वतंत्र लेन असावी, अशा सूचना एका सुनावणीदरम्यान मद्रास न्यायालयाने दिल्या आहेत. हा निर्णय मुळातच चुकीचा आहे. न्यायालयही आता वर्गवारी करू पाहात असेल तर ती बाब चिंताजनक आहे. न्यायासनावर बसून स्वतःसाठी न्याय करायचा आणि सामान्यांवर अन्याय करायचा हे न्याय्य नक्कीच नाही. वास्तविक, टोलआकारणी हीच बेकायदेशीर आहे. रस्ते चांगल्या दर्जाचे असणे हा हक्क आहे आणि ते पुरवणे हे सरकारच्या प्रशासकीय यंत्रणांचे कामच आहे. त्या रस्त्याचे व्यवस्थापनही त्याच करप्रणालीतून केले पाहिजे. मात्र, या सर्वांना फाटा देत टोल आकारणी करत राजरोसपणे नागरिकांच्या खिशातून पैशांची लूट होत आहे. याबाबत न्यायालयाने सरकारांची कानउघाडणी करायला हवी.

कशाला हवी “नवी वर्गवारी’? (भाग-1)

मध्यंतरी, केंद्रीय रस्तेवाहतूक-जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी अलिबागमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी स्वतःच म्हटले होते की, अलिबाग-पेणसारखा रस्ता आपल्याकडे आहे हे मला आत्ताच कळते आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चार किलोमीटरचे अंतर कापायला अर्धा तास लागला. त्यावर मंत्री म्हणून मला या रस्त्याची लाज वाटते, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली होती. कोणाही व्यक्‍तीला वेळा पाळायच्या असतील, सुखरूप पोहोचायचे असेल तर रस्ते चांगल्या दर्जाचे असणे आवश्‍यकच आहे, पण आज रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. त्याबाबत न्यायालयांनी कठोर आदेश दिले असते तर त्याचे जनसामान्यांतून स्वागत झाले असते. पण इथे न्यायाधीश केवळ आपला आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींचाच विचार करताना दिसताहेत.

चांगल्या रस्त्यांसंदर्भात उदाहरण देताना नेहमीच पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचा उल्लेख केला जातो. अनेक ठिकाणी या रस्त्याचा दाखलाही दिला जातो. हा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराने सांगितले होते की पहिल्या दहा वर्षात रस्ता खराब झाला तर मी कुठेही दुसरा रस्ता बांधणार नाही. त्यानुसार हा रस्ता कित्येक वर्षे चांगला होता. काही वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेने तो रस्ता दुतर्फा किंवा एकमार्गीकरणासाठी फोडला, तेव्हा या रस्त्याची स्थिती बिघडली, पण तोपर्यंत तो सुस्थितीत होता. असे असूनही त्या कॉन्ट्रॅक्‍टरला पुन्हा कुठल्याही रस्त्याचे काम मिळाले नाही; कारण रस्ता चांगल्या दर्जाचा बनवला तर इतरांचे पैशाचे कुरण बिघडते. त्यामुळे रस्ते चांगल्या दर्जाचे असणे हे महत्त्वाचे आहे. तसेच सुरक्षित आणि मुक्त प्रवास करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असलेच पाहिजे आणि ते स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे. कायद्याच्या क्षेत्रात नेहमीच असे म्हटले जाते की, न्याय झाला असे म्हणून भागत नाही तर तो दिसला पाहिजे, जगताना तो जाणवला पाहिजे. त्यामुळे रस्तेमार्गाने प्रवास करताना हा प्रवास सुखकर झाला पाहिजे हे जाणवले पाहिजे. ते जाणवत नसेल तर वेगळी लेन, वेगळी वर्तणूक द्या ही मागणी अथवा अपेक्षाच चुकीची आहे.

दुसरा एक मुद्दा म्हणजे, न्यायाधीशांनी ज्या टोलनाक्‍यांवर वेगळ्या लेनची अपेक्षा व्यक्‍त केली आहे, तो टोल आकारणे हेच मुळात चुकीचे आहे. भारतीय संविधानानुसार करसंकलनाचे अधिकार हे केवळ सरकारला आहेत; परंतु हे अधिकार सरकारने तिसऱ्या व्यक्तीकडे दिले आहेत. त्यानुसार विशिष्ट लांबीचा रस्ता बांधा आणि तिथून लोकांकडून कर वसुली करा, असे सरकारी अधिकार टोल कंपन्यांना मिळाले आहेत. या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सरकारी यंत्रणा वापरून रस्ते वापरण्यासाठीचा कर घेतला जातो. रस्ते चांगल्या दर्जाचे असणे हा हक्क आहे आणि ते पुरवणे हे सरकारच्या प्रशासकीय यंत्रणांचे कामच आहे. त्या रस्त्याचे व्यवस्थापनही त्याच करप्रणालीतून केले पाहिजे. मात्र, या सर्वांना फाटा देत टोल आकारणी करत राजरोसपणे नागरिकांच्या खिशातून पैशांची लूट होत आहे. लोकांच्या पैशावर पडलेली ही “टोळधाड’च आहे. त्यामुळे टोल देण्यासाठी वेगळी रांग करण्यापेक्षा टोलच बंद झाला पाहिजे.

आज परदेशात इलेक्‍ट्रॉनिक मशीनद्वारे आधीच टोल घेतला जातो आणि ते वाहन सरकताना त्याची माहिती मिळते आणि गाडीला हिरवा दिवा दिसून गाडीला तिथे थांबावे लागतच नाही. टोल चुकवण्याचा प्रयत्न केल्यास त्या गाडीचा नंबर घेतला जातो आणि त्याच्या खात्यातून पैसे वसूल केले जातात. अशी प्रणाली आपल्याकडे राबवण्याबाबत सूचना दिल्यास टोलवर रांगच राहणार नाही. त्यामुळे स्वतंत्र लेनचा मुद्दाच राहणार नाही. पण अशा प्रकारची सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका मांडण्याऐवजी न्यायालयाने केवळ मूठभरांसाठीचा मुद्दा पुढे करणे रास्त नाही. न्यायालयही आता वर्गवारी करू पाहात आहे, ही बाब चिंताजनक आहे. न्यायासनावर बसून स्वतःसाठी न्याय करायचा आणि सामान्यांवर अन्याय करायचा हे न्याय्य नक्कीच नाही.

– अॅड. असीम सरोदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)